November 21, 2024 8:57 pm

मिंद्यांच्या दडपशाहीचा परिपाक म्हणजे गायकवाडचा गोळीबार !

अपनी भाषा में पढ़े! Translate

असंतोषाचा उद्रेक झाला
की असेच काही तरी होते !
मिंद्यांच्या दडपशाहीचा परिपाक
म्हणजे गायकवाडचा गोळीबार !
काल रात्री न भूतो न भविष्यती अशी दुर्धना घडली. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलंकित करणारा हा प्रकार उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात घडला. भारतीय जनता पक्षाचे कल्याण लोकसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनी मिंधे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भर पोलीस ठाण्यात तेही पोलीस निरिक्षक अनिल जगताप यांच्या समक्ष त्यांच्याच केबिन मध्ये मिंधे गटाचे शहर अध्यक्ष महेश गायकवाड व त्यांचे सहकारी पाटील यांच्यावर बेछूट गोळीबार केला.
आमदार गणपत गायकवाड व महेश गायकवाड हे एकमेकांचे कट्टर वैरी असून त्यांच्यात पुर्वीपासून वाद आहे. महेश गायकवाड यांनी गेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांना गणपत गायकवाड यांच्या विरोधात उघडपणे समर्थन दिले होते.त्यावेळचे पालक मंत्री व शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे नेते विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बोडारेंना साथ होती. तेव्हापासून महेश गायकवाड व आमदार गणपत गायकवाड एकमेकांना वेळोवेळी आव्हान प्रतिआव्हान देत असतात. यावेळी धनंजय बोडारे उद्धव ठाकरे गटात असल्याने महेश गायकवाड यांनी आमदारकी लढवण्यासाठी कंबर कसली होती. त्यामुळे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्यापुढे महेश गायकवाड यांनी आव्हान उभे केले होते. त्यामुळे व्यावसायिक मतभेदाच्या जोडीला राजकिय वर्चस्ववादाचे स्वरूप आले होते.
दरम्यान भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांना डावलण्याची व अपमानीत करण्याची एकही संधी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सोडत नव्हते.आ. गायकवाड यांच्या निधीतून पुर्ण झालेले प्रकल्पांचे लोकार्पण वा भुमीपूजन खासदार करू लागले होते. त्यामुळे याला राजकिय कुरघोडीेचेही स्वरूप या वादामागे होते .त्यातूनच गणपत गायकवाड यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातून भाजपाचाच खासदार असेल व तो निवडूही येईल, अशी घोषणा करून मिंधे गटाला डिवचले होते. जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली तसे गणपत गायकवाड हे मुख्यमंत्री व त्यांचे खासदार पुत्र यांच्यावर उघड-उघड टीका करू लागले होते. भाजपाला कसे डावलले जाते याचे पाढे ते पक्षश्रेष्ठींकडे वारंवार वाचत होते.
यात भर म्हणजे दोघेही स्थानिक व बिल्डर व्यावसायिक असल्याने भुखडांनरूनही त्यांच्यात वाद- विवादाच्या फैरी झडत होत्या. कालचा वादही असाच द्वारली गावातील ५० गुंठे जमिनीच्या मालकी हक्कावरून झाला.गेले काही दिवस सुरू असलेला हा वाद काल विकोपाला गेला. गणपत गायवाड यांच्या दाव्यानुसार महेश गायकवाड यांनी त्यांच्या मुलाला मारहाण केल्याने गणपत गायकवाड यांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी हा गोळीबार केला. इतकेच नव्हे तर पोलीसांनी अडवले म्हणून तो वाचला, असेही उद्गार काढले.तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या गणपत गायकवाड यांनी एवढे टोकाचे पाऊल उचलले हा आत्मघाती निर्णय असला तरी त्यांनी मिंधे गटाच्या झुंडशाहीचा अतिरेक झाल्यानेच हे पाऊल उचलले आहे, हेच या घटनेवरून दिसून येते.
ही घटना प्रतिनिधीक आहे व ती मिंधे गटाच्या झुंडशाही व मनमानीला गंभीर इशारा देणारी आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्यानंतर शिवसेना फोडण्यासाठी जे दबाव तंत्र वापरले आहे त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांत प्रचंड असंतोष खदखदत आहे. इडीची धमकी देणे,(प्रतार सरनाईक, यामिनी जाधव, डॉ.बालाजी किणीकर इत्यादी) आयटीची चौकशी, जुने गुन्हे उकरून काढून ब्लॅकमेल करणे ( वामन म्हात्रे, अरविंद वाळेकर, राजेंद्र चौधरी) पोलीसी बळाचा वापर करून तडिपारीची कारवाईचा धाक दाखवणे
एम.के मढवी, बंड्या साळवी , सुरेश पाटील ) बंगला , हॉटेल तोडण्याची धमकी देणे ( रमेश चव्हाण , सुशिल पवार इत्यादी ) मुळ शिवसेनेच्या आमदार माजी महापौर व नेत्यांवर इडीचा ससेमिरा लावणे असा प्रचंड छळवाद सातत्याने सुरू आहे. सुरेश पाटील हा तर गेले वर्षभर तडिपार आहे. ही बाब हिटलरशाहीलाही लाजवणारी आहे.यातूनच नथुराम गोडसे,भिंद्रनवाले निर्माण होतात. आतंकवादाचा अंत व सहनशिलतेचा कडेलोट झाला की गणपत गायकवाड निर्माण होणारच.
कोणतेही पद वा सत्ता कायम स्वरूपी नसते.तिचा अंत हा ठरलेलाच असतो. ही घटना एकनाथ शिंदे गटाला इशारा देणारी आहे. ही वादळापुर्वीची शांतता आहे. तिचा उद्रेक होऊ न देणे भाजपा आश्रीत एकनाथ शिंदे यांचे कर्तव्य आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे गुन्हेगारीला नियंत्रित करू शकले नाहीत. त्यांच्याच पक्षाचे लोक कायदा हातात घेत आहेत. तरी ते मख्खपणे पाहत बसले व ४०० पारच्या वल्गना करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होमग्राऊंड ठाणे जिल्हा हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे.गणपत गायकवाड म्हणतात तसे येथे गुंड भूमाफिया पोसले जात आहेत, भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. गणपत गायकवाड हे एकनाथ शिंदे यांनी माझे करोडो रूपये खाल्ले ! असा उघड व जाहिर आरोप करीत आहेत. यामुळेच आज मलाही गुंड बनवले ! हे उद्गार गंभीरपणे घेण्याची गरज आहे. कालचा हल्ला हा महेश गायकवाड यांच्यावरील नसून मिंधेशाहीच्या झुंडशाही वरील हल्ला आहे.उपमुख्यमंत्री कोणाला डोक्यावर घेऊन नाचत आहेत व त्याचे किती गंभीर परिणाम होत आहेत व पुढे होतील याची ही नांदी समजली तर पुढील अनर्थ टळतील. अन्यथा आगामी निवडणुका रक्तरंजित होतील, या बद्धल माझ्या मनात संदेह नाही.
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!