पालघर जिल्ह्यातल्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती
पालघर जिल्ह्यातल्या ६२ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी, ८६ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदी आणि १०७ पोलीस अंमलदार यांना पोलीस नाईक पदी अशा २५५ पोलीस अंमलदारांना नुकतीच पदोन्नती देण्यात आली आहे.
या वर्षात २० जणांची अनुकंपा तत्वावर देखील भरती केली आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना रिक्त होणा-या पदामध्ये पदोन्नती देण्याचे निर्देश आहेत. मात्र मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाची नवनिर्मिती झाल्यानं मनुष्यबळ विभाजनाची प्रक्रिया प्रलंबित असल्यानं पोलीस अंमलदारांची पदोन्नती झाली नव्हती. यावेळी पदोन्नती मिळालेल्या सर्व पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.