व्यथा सच्चाईची व यशोगाथा निष्पक्ष पत्रकारितेची !
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे याने ५०-६० मारेकरी पाठवले होते. त्यावर लिहिलेला २ डिसेंबर २०२१ चा लेख. यावेळी २१ नोव्हेंबर २०२३ रोजी मिंधे गटाने माझी स्कुटर जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हा माझ्या धारदार लेखणीचा व निर्भीड पत्रकारितेचा सन्मान आहे. कोणत्याही विकतच्या पुरस्कारापेक्षा असे पुरस्कार मोलाचे असतात.
माझ्या बाबतीत घडलेली परवाची घटना संतापजनक तर होती पण व्यथित करणारी होती. एका पत्रकाराला धमकावण्यासाठी 50-60 लोकांचं टोळकं घरात घुसतं. काय ही मानसिकता? टीका पचवता येत नाही इतके मानसिक अधःपतन राजकारण्यांचे होत आहे. आपण इतर पक्ष, नेते, व्यक्ती यांच्या विरोधात मनसोक्त टीका करायची, पण आमच्यावर टीका म्हणजे काय ? असा अविर्भावात हे नेते वागतात. संयम, मर्यादा, संवैधानिक मार्ग, चर्चा, न्यायालय हे मार्ग उपलब्ध असताना इतका आततायी निर्णय घेणे लोकशाहीला घातक आहे.
*त्या लेखात प्रोटोकॉल न पाळल्याने स्वतःचे व पक्षाचे अवमूल्यन झाले याची वेदना एक ज्येष्ठ कार्यकर्ता व पत्रकार म्हणून व्यक्त केली होती. हाच काय तो अक्षम्य अपराध. असे असेल तर पत्रकार संपादकांवर रोजच हल्ले होतील.*
पत्रकार हा समाजाचा आरसा असतो.समाजातील वैगुण्य निदर्शनास आणणे, नीतिमत्ता जपली जात नसेल तर कानउघडणी करणे, समाजाचे प्रबोधन करणे, चांगल्याचा उदोउदो करणे व वाईटावर प्रहार करणे, हे तर पत्रकारांचे आद्य कर्तव्य आहे. समाजातील मोठमोठी आंदोलनं, चळवळी यांना पत्रकारांनी आपल्या लेखणी व वाणीने बळ दिले. निवडणूक काळात तर हेच राजकिय लोक आपल्या अनुकूल लिहावे म्हणून पत्रकारांची मनधरणी करीत असतात, पाकीट, पार्टी व प्रसिद्धी यांचा अनोखा संगम यावेळी पहावयास मिळतो.पण एकदा निवडणूक संपली की, रात गयी बात गयी.
परवा माझ्या बाबतीत जे घडले त्याचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही, खंत वा भीती तर मुळीच वाटत नाही. कारण इतका प्रखर विरोध होतो म्हणजे “बंदे की कलममे दम है, हेच सिद्ध झाले. ज्या संघटनेत मी 1973 पासून आजतागायत कार्यरत आहे, तिथे तुम्ही शिवसैनिक आहात की पत्रकार हे विचारणे किती हास्यास्पद आहे. शिवसैनिक पत्रकार नसावा का ? खुद्द मा.बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे पत्रकार नव्हते वा नाहीत का ? प्रबोधनकार ठाकरे तर अक्षरशः आग ओकायचे, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे देखील पत्रकार होते, आगरकर, टिळक हे पत्रकार होते म्हणून ते यांच्या यादीतून बाद होतात का ?
लोकशाही, संविधान, साधनसुचिता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा उदोउदो करायचा आणि एका प्रामाणिक पत्रकाराचा आवाज दडपायचा यात कसली आली मर्दुमकी ? तसेही उल्हासनगर हे पत्रकारांवरील अत्याचाराबाबत कुप्रसिद्धच आहे. ब्लिट्ज साप्ताहिकाचे उपसंपादक पत्रकार ए.व्ही.नारायण यांच्या भर रस्त्यात झालेल्या क्रूर हत्येचा क्षण आठवा, मी त्याचा साक्षीदार आहे. दुनिचंद कलानी देखील एक पत्रकार होते, त्यांची ही भररस्यात हत्या झाली होती, तेही मी पाहिले आहे. कै. श्रीचंद आहुजा यांना देखील खुनाच्या धमक्या तत्कालीन राजकीय डाॅन देत होता. पत्रकार कै.अशोक बोधांवर देखील प्राणघातक हल्ला झाला होता. खुद्द माझ्यावर हल्ला करण्यासाठी तलवार, चाॅपर आदी हत्यारं घेऊन एका डाॅनने 20 वर्षापुर्वी मारेकरी पाठवले होते पण निशस्र असलेल्या मी माझे मालवणी रूप दाखवून त्या शस्रसज्ज मारेक-यांना पळवुन लावले होते. आणि त्यांच्या सूत्रधार डाॅनला एमपीडीए खाली एक वर्ष नाशिक जेलची हवा खावी लागली होती.
शिवसैनिकांनी माझ्या विरोधात केलेला हा दुसरा आत्मघातकी प्रकार. लबाड बोक्यांचे दुटप्पी राजकारण ! या माझ्या संपादकीयामुळे तत्कालीन शिवसेना पदाधिका-यांनी माझा मुर्दाबाद करत मोर्चा काढून माझ्या अजब लोकशक्तीचे अंक जाळण्याची मर्दुमकी दाखवली होती. त्या बदल्यात मी त्या दोन्ही पदाधिका-यांना मा.बाळासाहेबांच्या आदेशाने पदमुक्त करायला लावले होते.परवा या प्रकाराची पुनरावृत्ती झाली. पण हात त्यांचेच पोळले. त्यांची प्रतिमा डागाळली तर माझी तावून सुलाखून निघाल्याने उजळून निघाली. पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत मी तक्रार नोंदवली असती तर या लोकांना प्रत्येकी पन्नास हजार दंड व तीन वर्ष तुरंगवासाची शिक्षा झाली असती.पण मी तक्रार केली नाही, यातच त्यांचा पराभव झाला आहे.
मी चाळीस वर्षे पत्रकारीतेत असूनही मला कोणाताही पुरस्कार कसा मिळाला नाही ? कारण त्यासाठी अजातशत्रू असावे लागते. पानी रे पानी तेरा रंग कैसा ? तर जिसमे मिलाये उस जैसा , असे असावे लागते.माझा एक ज्युनियर पत्रकार म्हणतो मला दीड हजार पुरस्कार मिळाले आहेत. परंतू मला मिळालेले दोन पुरस्कार लाख मोलाचे आहेत. ज्या पक्षात मी माझ्या आयुष्याची 47 वर्षं घालवली त्या पक्षाने मला दोन पुरस्कार दिले. एकदा माझा मुर्दाबाद करीत माझे साप्ताहिक जाळले तो आणि परवा 60-70 लोकांनी माझ्या घरी येऊन जो तमाशा केला, तो देखील मोठा दुसरा पुरस्कार आहे.आजवर कोणत्याही पत्रकाराला असा पुरस्कार प्राप्त झालेला नाही. निष्पक्षपाती पत्रकाराचा पुरस्कार काय असतो ? याचे हे एक मोठे व अजरामर उदाहरण ठरावे. स्वपक्षीयांचा देखील मुलाहिजा न ठेवता मी पत्रकारितेचे अग्निहोत्र अबाधितपणे सुरू ठेवले आहे. मला काळीमा फासू पाहणा-यांचेच हात व तोंड काळे झाले, यापेक्षा एका निष्पक्ष पत्रकारास अजून काय हवे ?
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470