दुबई शॉपिंग फेस्टिवलच्या धर्तीवर २० ते २८ जानेवारी दरम्यान मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन
प्रतिनिधी-अर्जुन आहेर
मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन येत्या जानेवारी महिन्यात २० ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरातल्या विविध भागांमध्ये करण्यात येणार आहे. अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांची सह्याद्री अतिथी गृहात आज भेट घेतली. यावेळी पर्यटन विषयावर विस्तृत चर्चा झाली असून या बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक डॉ बी. एन. पाटील आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा शर्मा उपस्थित होत्या. यावेळी मुंबईतील पर्यटन वृध्दीस चालना मिळुन राज्याच्या महसूलात देखील वाढ होईल असे मत पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केलं.
दुबई शॉपिंग फेस्टीव्हलच्या धर्तीवर या महोत्सवाच्या मंडळाची स्थापना प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. या मंडळामध्ये शासकीय आणि अशासकीय सदस्यांसह पर्यटन क्षेत्राशी निगडीत व्यावसायिक, उद्योजक आणि इतर संबधित व्यक्तीं सहभागी झाल्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळेल. त्याबरोबरच राज्याच्या कला आणि संस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल.