करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- श्रावण महिना आला की सणांची रेलचेल जाणवते. अनेक वेगवेगळ्या सणामुळे सर्वत्र धामधूम व आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. यातच लहानांपासून ते मोठ्यापर्यंत आवडणारा सण म्हणजे नागपंचमी होय.
नागपंचमी सणा निमीत्त सोलापूर जिल्ह्यात पतंग उडविण्याच्या मोह कोणालाही आवरता न येणारा सण. परंतु काळाच्या ओघात व धकाधुकीच्या जीवनात तसेच मोबाईल युगात पतंग उडविण्याच्या प्रमाणात मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे. पूर्वी आकाशात पक्षांच्या थव्या प्रमाणे पतंग उडताना दिसायचे जे डोळ्यानेही मोजता येत नसे. परंतु आजकाल बोटावर मोजण्याइतके सुध्दा पतंग उडताना दिसत नाही.
काही वर्षांपूर्वी नागपंचमीला पतंग पंचमी म्हणुन ही ओळखले जायचे लहान मुले ठिकठिकाणी जाऊन काचेच्या बाटल्या शोधायचे त्या एका खलबत्त्यात कुटून बारीक चाळ करून गाळणीने चाळून घेत असे. त्या नंतर एखाद्या ठिकाणी तीन दगडांची चूल मांडून आवडता रंग टाकून सरस शिजविली जात असे. मांजा (दोऱ्याचा रिळ) आणला जायचा त्यामध्ये ही गोल मांजा, साखळी मांजा, ई. अनेक प्रकार असायचे ही सर्व तयारी करून ही लहान मोठी मंडळी मोकळ्या ठिकाणी जाऊन पहिला व्यक्ती (एका पाठोपाठ एक असे अनेकजण) हातात दोरा घेऊन दूरच्या दूर जात असताना दुसरा व्यक्ती सरसे मध्ये दोरा भिजवून देत असे तर तिसरा व्यक्ती हातामध्ये कापड घेऊन दोऱ्याला कुटलेली काच लावत असे तर चौथा व्यक्ती आसारी (भिंगरी) ला दोरा गुंडाळून येत असे. त्यावेळी प्रत्येकाची आरडा ओरड, गलबलाट मनाला प्रसन्न करून आनंदी वातावरण तयार करत असे. पंचमी च्या आदल्या दिवशी पतंग आणून त्याला सूत्र पाडणे, शेपटी तयार करणे अशा प्रकारे आनंद साजरा करण्याची युद्ध पातळीवर तयारी केली जात असे. तर पंचमी दिवशी एकमेकाचा पतंग काटून एकमेकाला ओरडून खुन्नस दिली जात असे. तो आनंदही शब्दात वर्णन करता येणार नाही असा आसायचा.
परंतू आजकाल बाजारात मशिनद्वारे तयार केलेला नायलॉन मांजा (दोरा) विक्रीसाठी आला आणी जुने सगळे आनंदाचे क्षण हिरावून नेले. या नायलॉन दोऱ्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या असुन अनेकांचे प्राण या नायलॉन मांजा मुळे गेलेले आहेत. तरी अशा जिवघेण्या नायलॉन मांजा पासून लहान मोठ्यांनी काळजी पूर्वक रहाण्याची गरज आहे.
शेवटी गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असेच म्हणावे लागेल.