बायकोला वेडी म्हणाला म्हणून इंदापूर न्यायालयाने ठोकला 10 हजार रुपयांचा दंड व दोन महिने कारावास
(निलेश गायकवाड )
पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तू वेडी आहेस म्हणणाऱ्या पतीस इंदापूर न्यायालयाने दोन महिने कारावास व दहा हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावलीय. न्यायालयाने आरोपी पती अतूल बापूराव काळे वय २६ वर्षे याला दोषी ठरवले असून दोन महिने साधा कारावास व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास २० दिवस कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.तर फिर्यादी महिलेचे सासु सासरे व इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
इंदापूर तालुक्यातील सणसर येथील विवाहित महिलेला पती व सासरच्या मंडळीकडून तू वेडी आहे, तुला आम्हाला नांदवायचे नाही. तुम्ही लग्नात मान दिला नाही म्हणत फिर्यादी महिलेस वेळोवेळी उपाशी पोटी ठेवून शारीरिक व मानसिक त्रास दिला. तिला शिवीगाळ दमदाटी करत हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण देखील करण्यात आली होती.
फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरुन तिचा पती, सासू-सासरे व इतर ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलीस हवालदार वसंत वाघुले, न्यायालय अंमलदार सचिन खुळे,पोलिस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांनी सहकार्य केले.
या खटल्यात सरकारी पक्षाकडून अँड.अमरदीप लोहकरे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. न्यायाधीश के.सी. कलाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर यांनी फिर्यादी पक्षाचा पुरावा उचित ठरवत आरोपी पती याच्याकडून पत्नीवर झालेला मानसिक व शारीरिक छळाप्रकरणी दोन महिने कारावास व दहा हजार रुपयांचा दंड शिक्षा ठोठावण्यात आली.