करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा तालुका ऐतिहासिक दृष्ट्या महत्वपूर्ण असतानाही शासनाच्या दुर्लक्षपणामुळे ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. करमाळा शहारात भूईकोट किल्ला, कारंजा विहीर, बारव विहीर, सात विहीर, खोलेश्र्वर मंदिर, विष्णू मंदिर, गणपती मंदीर आदी ऐतिहासिक व धार्मिक स्थळे आहेत.
सध्या करमाळा शहरातली भुईकोट किल्ल्याचे सर्व बुरुज ढासळलेले असुन फक्त वेस तेवढी शिल्लक राहिली आहे. ती सुध्दा काही इतिहास प्रेमी व लोकप्रिय हनुमान तरुण मंडळाच्या अथक परिश्रमाने सद्यस्थितीत व्यवस्थित आहे. परंतु सदर वेशीवर व त्याच्या भिंतीतून वारंवार अनेक झाडे उगवत असल्याने काही दिवसांत ती सुध्दा ढासळलेली दिसू शकते यासाठी शासनाचे लवकरात लवकर किल्ल्याचे राहिलेले अवशेष जतन करणेसाठी ठोस उपायोजना करणे गरजेचे आहे.
किल्ला विभागातील ऐतिहासिक कारंजा विहिरीचे ही अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. सदरची विहीर पूर्ण चिरेबंदी असुन अशा कलाकुसरीच्या वास्तू सहसा कोठेही पहावयास मिळत नाही. सदर विहिरीत अनेक वर्षे गणपती विसर्जन, पूजा पाठ साहित्य विसर्जन होत असल्याने व आज पर्यंत गाळ काढलेला नसल्याने नैसर्गिक झरे ही आटत चालले आहेत. सदर विहिरीच्या आजूबाजूने काटेरी झाडे झुडपे वाढल्याने विहिरीचे सौंदर्य नष्ट होऊ लागले आहे. सदर ठिकाणे पाहण्यास आलेल्या इतिहास प्रेमींनी याबाबत खुप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे.
सदर विहीर स्वच्छतेसाठी शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या वतीने कोणतीही ठोस कार्यवाही होत नसेल तर करमाळा तालुक्यातील व शहरातली तसेच सर्व इतिहास प्रेमींनी योगदान दिल्यास ऐतिहासिक ठेवा जतन करण्यास मोठा हातभार लागेल.