महापालिकेतील घोटाळ्यांचे गौडबंगाल – भाग-६ वा
महिला व बाल कल्याण समितीतील
अंगणवाडीच्या साहित्य पुरवठ्यातील घोटाळ्याचा गौप्यस्फोट
हा लेख मी ११ जुलै २०१९ रोजी लिहिला होता व प्रधान महालेखाकार, मुंबई (CAG) यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार प्रधान महालेखाकार, मुंबई यांनी यातील आक्षेपांचे ऑडिट करून माझ्या आक्षेपांवर शिक्कामोर्तब केले.सदरऑडिट रिपोर्ट वाचल्यास माझ्या लेखणीच्या ताकदीचा अंदाज येईल.
सदर ऑडिट रिपोर्ट या लेखा खाली देत आहे. या खेरीज डस्टबीन खरेदीचापण पर्दाफास केला होते.तो उद्या वाचा.
गेल्या पाच वर्षात अंगणवाडीस सरासरी दरवर्षी 20 लाखाचे साहित्य पुरविण्यासाठी निविदा मागवल्या गेल्या, कार्यादेश दिले गेले, बीलंही अदा केली गेली.पण सदर साहित्य 210 अंगणवाड्यांतील सुमारे 5300 विद्यार्थ्यांना दिल्याचा, स्टाॅक रजिस्टर मधील नोंदी,अथवा लाभार्थ्यांची यादी एकाही वर्षी उपलब्ध नाही. महिला व बाल कल्याण प्रकल्प अधिकारी मागणीचे पत्र देतात,आणि महिला व बाल कल्याण समिती उदारहस्ते मागणी प्रमाणे साहित्य मागवण्यासाठी निविदा काढते. कार्यादेशही काढते,संबंधित ठेकेदारांचे बीलंही इसमाने इतबारे अदा केले जाते,पण 210 अंगणवाडीतील किमान प्रत्येकी एक अंगणवाडी सेविकेचे सदरहू साहित्य प्राप्त झाल्याची पोच एकाही वर्षी आढळून आलेली नाही. वाटप केल्याचे पुरावे नाहीत. फक्त प्रकल्प अधिकारी एका ओळीचे पत्र देऊन मोकळे होतात. पाच वर्षातील प्रत्येक अंगणवाडीस उपरोक्त साहित्य दिल्याचे 210 फोटो हवेत पण पाच दहा फोटोच उपलब्ध आहेत. या बाबत अंगणवाडी प्रकल्प अधिका-यांवरही संशयाची व संगनममताची सूई येऊन थांबते. या साहित्याच्या खरेदीचे दर चक्रावणारे आहेत. ब्लॅक बोर्ड (फळे),वजन काटे, तक्ता व खेळणीचे दर अफाट आहेत.एक रंगीत खडू 25 रूपयांस पडतो.फळे व वजन काट्यावर दरवर्षी 6 ते 7.5 लाख खर्च होतो.फळे व वजन काटे दरवर्षी लागतात का ? या खरेदीची रक्कम दरवर्षी 18 ते 24 लाखांची असताना कधीही थर्ड पार्टी ऑडिट झालेले नाही,स्टाॅक रजिस्टर, आवक जावक रजिस्टर उपलब्ध नाही.
आंधळा राजा आणि मुकी प्रजा.यांना बालकांच्या योजनेतही भ्रष्टाचार करताना लाज कशी वाटत नाही. या भ्रष्टाचारास प्रोत्साहन देणारे व संरक्षण देणारे सर्वच पापी आहेत.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470