आदर्श पुरस्कार प्राप्त अमळनेर तालुका पत्रकार संघाचा
अमळनेर येथे साने गुरुजी परिवाराकडून हृद् सत्कार
अमळनेर- येथील अमळनेर शहर तालुका पत्रकार संघास नुकताच कर्जत येथे आयोजित अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या मेळाव्यात परिषदेच्या वतीने पत्रकार संघाच्या सर्वस्पर्शी सामाजिक योगदान व सामान्य जनतेच्या प्रश्नांची सातत्याने बाजू लावून धरल्याबद्दल ‘सामना’ चे संपादक खा. संजय राऊत यांच्या हस्ते व स्वागताध्यक्ष आ. रोहितदादा पवार, मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस हाजी मन्सुरभाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक विभागातून आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. याबद्दल तालुका पत्रकार संघावर तालुक्यात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अमळनेर तालुका पत्रकार संघाला प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अमळनेरच्या साने गुरुजी परिवाराच्या वतीने हेमकांत पाटील, माजी नगरसेवक संदीप घोरपडे यांनी तालुक्यासाठी ही गौरवाची बाब असल्याने पुढाकार घेतला व आज बुधवार रोजी अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदीरात अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष गो. पि. लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय सचिव रोहिदास हाके, ‘सकाळ’ चे प्रतिनिधी प्रा. पी. एन. पाटील यांच्या उपस्थितीत अमळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सचिव चंद्रकांत पाटील व कार्यकारिणीचा शानदार सत्कार करून गौरविण्यात आले. यावेळी रोहिदास हाके, प्रा. पी. एन. पाटील, तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजय कृष्णा पाटील, ज्येष्ठ पत्रकार वसंतराव पाटील, ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. साने गुरुजी परिवाराच्या वतीने आयोजित केलेला विशेष म्हणजे हा सत्कार समारंभ सपत्निक आयोजित करण्यात आला होता. भगिनींसाठी हळदी कुकुंवाचाही कार्यक्रम पार पडला व सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक साने गुरुजी शिक्षण मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी केले तर
सूत्रसंचालन विलास चौधरी सर यांनी केले यावेळी शहर तालुक्यातून मोठ्या संख्येने पत्रकार बांधव व साने गुरुजी परिवार उपस्थित होता.