करमाळा प्रतिनिधी :- शिवसेना कोणाची हा वाद अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात चालू होता. नुकताच निवडणूक आयोगाने शिवसेना नांव आणि चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्याने शिंदे गटातील शिवसैनिकांत चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे मुळ शिवसेना शिंदे यांच्याकडे आल्याने करमाळयातील युवा सेना तालुका प्रमुख राहुल कानगुडे यांनी तालुक्यात झंझावती दौरा करून देवळाली, खडकेवाडी, रोशेवाडी, वरकटणे, इ. गावात मराठी नववर्षाच्या निमीत्ताने शाखा उद्घाटन केले.
याबाबत राहुल कानगुडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व व मराठी बांधवांसाठी शिवसेना स्थापन केली होती. परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी शिवसेना ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली होती. परंतु महाराष्ट्राचे संवदेनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मूळ विचारांच्या पक्षासोबत स्थापन करून बाळासाहेबांचे विचार सत्यात उतरवले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मूळ बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा घरोघरी पोहचविण्यास सुरूवात केली आहे. गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक निर्माण करण्यासाठी आम्हाला शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत, माजी आमदार नारायण आबा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, युवा नेते पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
पुढे बोलताना कानगुडे म्हणाले की, वैदयकीय मदत कक्षातील कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचे मार्फत गरजूंना मोफत उपचार मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच करमाळा तालुक्यातील जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणूका होणार असून सर्वच्या सर्व निवडणूका शिवसेना एकहाती जिंकून करमाळा मतदार संघावरील शिवसेनेची पकड मजबूत ठेवणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकहिताच्या निर्णयामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने ते रात्रीच्या झोपीतही शिंदे साहेबांच्या विरोधी जप करण्यात व्यस्त आहेत. मात्र शिंदे साहेब यांचा आदर्श घेवून आम्ही नाहक वल्गनांकडे लक्ष न देता नागरिकांच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे.
तसेच पक्ष कार्य करताना आम्हाला पंचायत समिती सभापती गहिनीनाथ ननवरे, सतीश कानगुडे, युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, तालुका उपप्रमुख लखन शिंदे, दादासाहेब तनपुरे, शहर प्रमुख विशाल गायकवाड, सुधीर आवटे आदींचे सहकार्य लाभत आहे.