माई डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत आगळा-वेगळा महिला दिन
स्वयंपाकी महिला कर्मचाऱ्यांना दिली एक दिवसाची सुट्टी
पुरुष मंडळींनी बनविला मुलींसाठी स्वयंपाक
रजत डेकाटे // नागपूर प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेतील महिलांविषयी आदरयुक्त भावना, प्रेम व्यक्त करण्यासाठी अनाथांची माई पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन कुंभारवळण या संस्थेत एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेतील स्वयंपाकी महिला कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी देऊन पुरुष मंडळींनी त्यांचे कौशल्य पणाला लावत ५६ अनाथ मुली आणि कर्मचारी वर्ग असे ७६ जणांसाठी सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे गोड जेवण असा दिवसभराचा स्वयंपाक बनवून प्रमुख मान्यवर अतिथींच्या हस्ते गुलाबपुष्प भेट देऊन त्यांच्या सेवेचा गुणगौरव केला आहे. अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या त्या महिलांना आगळी-वेगळी विशेष भेट ठरली आहे.
प्रत्येक महिलांच्या जीवनात असणाऱ्या योगदानाला आणि स्त्रीत्वाला साजरा करण्याच्या अनुशंगानं या दिवसाचं महत्त्व अधिक आहे. स्त्रीशक्ती आणि त्यांच्या कर्तृत्त्वाची प्रशंसा या दिवशी आवर्जून केली जाते. महिला दिन साजरा करण्यासाठी कोणा एका दिवसाची आवश्यकता नाही. कारण, दर दिवशी महिलांचं महत्त्व हे कायम तितकंच असतं. पण, हे जग एक उत्तम स्थान बनवण्यासाठी महिलांचं योगदान पाहता याच योगदानाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सासवड लगतच्या कुंभारवळण येथे पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांनी १९९३ साली अनाथ मुलींसाठी ममता बाल सदन हि पहिला संस्था स्थापना केली. माईंनी सांभाळलेले पाहिले मानसपुत्र दिपक दादा गायकवाड आज स्थितीत अध्यक्ष म्हणून संस्थेचे कार्य पुढे नेत असून माईंच्या सामाजिक कार्याचा वारसा यशस्वीपणे पुढें नेत आहेत. हि संस्था नाही एक परिवार आहे अशी त्यांची प्रामाणिक भावना आहे. याच भावनेतून त्यांनी आपल्या संस्थेतील महिलांना आगळी-वेगळी भेट दिली. मुलींसाठी रोज दिवसातून तीनवेळा स्वयंपाक बनविण्यात येतो, त्यासाठी मागील अनेक वर्षांपासून महिला सेवाभावी वृत्तीने अविरत सेवा देत आहेत. यामध्ये कार्यालय सांभाळणाऱ्या महिला ते भांडी धुणाऱ्या ताई यांचा देखील समावेश आहे. स्वतः दिपक दादा यांनी आज सकाळपासून किचनरुमचा ताबा घेतला होता. आज दिवसभर कुणी हि महिला काम करणार नाही, आज तुम्हाला सुट्टी दिली असून आज आम्ही स्वयंपाक करून तुम्हाला जेऊ घालणार आहोत, असे सांगितले. त्यामुळे दिवसभर पुरुषमंडळी यांचा किचनरूममध्ये वावर दिसून आला. अधीक्षिका स्मिता अरविंद पानसरे, सौ. सुजाता दिपक गायकवाड, सरोज जांगडा, ज्योती सिंधुताई सपकाळ, चांदणी शिरोळकर, सिंधू विठोबा गजरमल, रुख्मा उत्तमराव वैद्य, मंदा यन्नथ पवार, कौसल्या राजू नेटके, अर्चना नारायण कड आदी महिलांचा एचडीएफसी बँकेचे आरएम मयुरी टिळेकर, ब्रांच मॅनेजर कल्पेश क्षिरसागर, ब्रांच मॅनेजर मिलिंद व्यास सागर चव्हाण, संभाजी लोहार, ओंकार कुदळे, विशाल महामुने, किरण राठोड यांच्याहस्ते गुलाबपुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड यांच्या संकल्पनेतून धावपळीची जीवनशैली आणि वाढत्या ताणतणावामुळे महिला वर्गामध्ये आरोग्याच्या समस्या वाढत असून या उपक्रमाच्या माध्यमातून तणावमुक्त जीवन जगण्यासाठी महिलांना प्रेरणा मिळाली आहे. संस्थेतील पुरुष मंडळींनी तितक्याच उत्साहात महिलेविषयी प्रेम व्यक्त करत ‘महिलांच्या योगदानाविषयी जाणीव असणे गरजेचे आहे’ असा मोलाचा संदेश दिला. जागतिक महिला दिनानिमित्त कु. आरती हिने मी सिंधुताई सपकाळ बोलतेय हा एकपात्री प्रयोग सादर केला. कु. जान्हवी हिने लता मंगेशकर, कु. पूजा हिने डॉ. आनंदीबाई जोशी, कु. आर्या हिने कल्पना चावला, कु. पायल हिने राजमाता जिजाऊ, कु. पूनम हिने किरण बेदी, कु. अनुजा हिने मदर तेरेसा पावनी हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. तर कु. शीतल हिने अठराव्या शतकातील महिलांचे दारिद्र्य याविषयावर सखोल माहिती सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी, तर आभार अधीक्षिका स्मिता पानसरे यांनी मानले.