करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- सन २०२२-२३ हे आर्थिक वर्ष (३१ मार्च २०२३) संपण्यास काही दिवस शिल्लक असल्याने करमाळा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पाणीबील व घरपट्टी वसुलीसाठी जोरदार मोहीम मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली आहे. सदर मोहिमेअंतर्गत थकबाकी दारांना वारंवार सूचना देऊनही जे नागरिक नागरपरिषदेतील थकबाकी कर भरणा करीत नाहीत अशा नागरिकांचे नळ कनेक्शन बंद केले जात आहेत तसेच जे नागरिक घरपट्टी थकबाकी बिल भरणा करीत नाहीत अशा नागरिकांच्या मालमत्तेला सील केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांची भलतीच तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे.
यासाठी मार्मिक समाचार ने करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्याशी थेट संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, नगरपरिषदेने वारंवार थकबाकी दारांना थकबाकी भरण्यासाठी आवाहन केले आहे. घरपट्टी बिल, पाणी बिल तसेच घंटागाडी च्या गाडीवर सुद्धा थकबाकी भरण्याबाबत वेळोवेळी कळविले आहे. परंतु काही नागरिक, गाळेधारक जाणीवपूर्वक थकबाकी भरण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. अशा नागरिकांवर नळ संयोजन बंद करणे, मालमत्ता सील करणे व गाळाधारकांचे गाळे सील करुन ताब्यात घेणे इ. कारवाईचा बडगा उगारल्याशिवाय पर्याय नाही. शासनाचा निधी प्राप्त करण्यासाठी वसुली होणे क्रमप्राप्त आहे वसुली झाली तरच नागरिकांना सर्वोतोपरी सेवा देणे सुलभ होणार आहे. तरी कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी थकबाकी भरून नागरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी लोंढे यांनी थकबाकीदार यांना केले आहे.