संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वॉकवेळी हल्ला, लोखंडी रॉड आणि स्टम्पने मारहाण; रुग्णालयात दाखल
प्रतिनिधी- अर्जुन आहेर
मुंबई : मनसेचे नेते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्या शिवाजी पार्क येथे हल्ला झाला. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात हा हल्ला झाल्याने या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
संदीप देशपांडे हे आज नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्कात आले होते. यावेळी मॉर्निंग वॉक करत असतानाच अचानक काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे प्रतिकार करू शकले नाही. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे देशपांडे जखमी होऊन खाली कोसळले. देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांनी देशपांडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशपांडे यांची प्रकृती गंभीर नसल्याचं सांगितलं जात आहे.
संदीप देशपांडे यांना कोणतंही संरक्षण नव्हतं. मागे त्यांना पोलीस संरक्षण देऊ केलं होतं. पण त्यांनी ते नाकारलं होतं. संरक्षणाशिवायच ते लोकांमध्ये मिसळायचे. त्याचाच फायदा घेऊन हा हल्ला करण्यात आला असावा असं सांगितलं जात आहे. तसेच हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा एक भाग असावा अशी शक्यताही वर्तवली जात आहे.