मतदारसंघातील ग्रामीण भागासाठी 35 शवपेट्या आणि 66 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर!
प्रतिनीधी.संदिप कायगुडे
कर्जत/जामखेड | कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. अशातच कर्जत-जामखेड मतदारसंघातील ग्रामीण भागात सौर ऊर्जा आणि विजेवर चालणाऱ्या 35 शवपेट्या आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून देण्यात येणार आहेत. त्यासाठी 66 लाख 50 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात एखाद्याचा मृत्यू झाल्यास काही कारणास्तव अंत्यसंस्कार करण्यास विलंब होत असल्यास संबंधित पार्थिव नगर येथील शवागारात ठेवावे लागते. त्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून या शवपेट्या उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे वीज उपलब्ध नसेल तर सौर ऊर्जेवरही वापरता येतील, अशा या शवपेट्या आहेत.
आमदार रोहित पवार यांनी या संबंधी बोलत असताना म्हटले की, त्यांना मतदारसंघात बरेच अनुभव असे आले की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नातेवाईक येण्यास विलंब होत असल्याने अथवा रात्री उशिरा मृत्यू झाल्यास दुसऱ्या दिवशी पर्यंत मृतदेह ठेवावा लागतो. त्यात नगरला मृतदेह नेऊन ठेवण्यासाठी नातेवाईकांची मोठी गैरसोय होते. या सर्व गोष्टी समजल्यानंतर रोहीतदादांच्या माध्यमातून आता संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राला शवपेट्या दिल्या जाणार आहेत आणि त्याचा फायदा संबंधित ग्रामस्थांना अडचणीच्या काळात होणार आहे.