जागतिक किर्तीचे सिंधी संत स्वामी शांती प्रकाश महाराज

अपनी भाषा में पढ़े! Translate

905691660_1125630173716923_5371265299415002023_n

जागतिक किर्तीचे सिंधी संत
स्वामी शांती प्रकाश महाराज

भारत-पाकिस्तान फाळणीनंतर स्वामीजी भारत भूमी मध्ये आले व उल्हासनगर महाराष्ट्र येथे प्रेम प्रकाश आश्रमाची स्थापना केली. जेथे ते दररोज सत्संग करायचे, तहानलेल्यांची तहान भागवायचे. स्वामीजी म्हणजे दया, प्रेम, करुणा यांची सर्वगुण संपन्न मूर्ती होती. त्यांच्या दर्शनाने सर्व दुःख दूर व्हायचे. स्वामीजी भक्तांच्या सेवेत सकाळ पासुन ते रात्री बारा एक वाजेपर्यंत मग्न रहायचे. त्यांची वाणी मधुर होती. ती भक्तांना आकर्षित करायची.
स्वामीजी जितके प्रेम मनुष्या जातीवर करत होते, तितकेच ते पशुपक्षांवर देखील करायचे. स्वामीजी जेथे कुठे प्रवचन करायला जायचे तेथे ते नेहमी आपल्या प्रवचनात पशु पक्षी जीवनांवर प्रेम तसेच मांस दारु यांचा त्याग करण्याचे आवाहन करीत असे.

स्वामी शांती प्रकाशजी महाराज यांचा जन्म सन १९०७ मध्ये सिंध प्रांतातील सक्खर जिल्ह्यामधील चक गांव येथे एका प्रतिष्ठित परिवारामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नांव श्री. आसुदोमल पहुजा होते. स्वामीजींची आई श्रीमती जुगलबाई त्यांना नेहमी देवी देवतांच्या गोष्टी सांगायची. अशा घरात धार्मिक वातावरण असल्याकारणाने भक्तिमय वातावरणात स्वामीजींचे बालपण गेले. गावातील प्राथमिक शाळेपासुन त्यांनी शिक्षणाला प्रारंभ केला. तेव्हापासुन त्यांची गुणवता व हुशारी पाहुन शिक्षक त्यांच्यावर प्रभावित झाले. त्यांनी तिसरीपर्यंत शिक्षण पुर्ण केले, पुढे अचानक देवी या साथीच्या आजारामुळे त्यांना आपले डोळे गमवावे लागले. त्यामुळे त्यांचे आई-वडील खुप चिंताग्रस्त झाले.
स्वामीजींच्या आई-वडिलांनी भरपुर प्रयत्न केल्यानंतर ही यश न आल्यावर ते संत साई हरिचुराम यांच्याकडे घेऊन गेले. साई हरिचुराम हे सिध्द पुरुष होते. त्यांनी भविष्यवाणी केली की, या बाळाचे बाहेरील डोळे जरी गेले असले तरी त्यांचे आतील डोळे उघडतील व तो सिंध प्रांताच्या दक्षिण दिशेला जाईल आणि संत होईल. साई हरिचुराम यांची वाणी ऐकून श्री. आसुदाराम प्रसन्न झाले व पुढील काही वर्ष साई हरिचुराम आणि धर्मूराव साहेब यांच्या सेवेशी ठेवले. त्यानंतर पुढील काही वर्षानंतर स्वामीजींचे वडिल स्वामीजींना घेऊन तत्कालीन प्रसिध्द स्वामी टेऊराम महाराज यांच्या अमरापुर येथील मठात घेऊन गेले. पुढे स्वामीजी मनोभावे संत टेऊराम, स्वामी ग्वालानंद महाराज, स्वामी सर्वानंद महाराज यांच्या सेवेत मग्न झाले. स्वामीजींची सेवा भक्ती पाहुन स्वामी टेऊराम महाराज स्वामींवर प्रसन्न झाले व त्यांनी स्वामीजींना गुरु दिक्षा देऊन आपले शिष्य बनविले.
पुढे स्वामीजींनी विभिन्न प्रांतात जाऊन ग्रंथ, शास्त्र यांचा अभ्यास केला, जसे की, हैद्राबाद येथील ऋषी दयाराम गिडुमल संस्कृत शाळेमध्ये संस्कृत भाषेचे अध्ययन केले. तसेच शास्त्राच्या अभ्यासासाठी हरिद्वार येथे गेले, तेथे श्री. चेतनदेव यांच्या मठात स्वामी शंकरानंद महाराज व गुरुमुखदासजी यांच्याकडून शिक्षण घेतले तसेच श्री. गुरुग्रंथ साहेब यांच्या अध्ययनासाठी स्वामीजी अमृतसरला गेले.
तिथे ते दोन वर्ष राहिले. परंतु ते सर्व शिकून झाल्यानंतर स्वामीजी सतगुरु टेऊराम महाराज यांच्या अमरापुर येथील मठात राहिले.
स्वामीजींच्या कार्यकाळात स्वातंत्र्याचे आंदोलनाचे पर्व सुरू झाले होते. स्वामीजींची स्वातंत्र्याच्या आंदोलनात देखील सक्रीय सहभाग घेतला व संदेश दिला की, भक्तांमध्ये ईश्वर भक्ती बरोबरच देशभक्ती पण जागृत झाली पाहिजे. स्वामजींवर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारधारांचा जबरदस्त प्रभाव होता. स्वामीजींनी स्वदेशी वस्तुचा स्वीकार केला, हरिजनांना आपलेसे केले.
स्वामीजी चमत्कारापासुन नेहमी दुर राहिले. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर असे की, एक वेळा एक माता आपल्या बाळाला झोळीत टाकुन स्वामीजींकडे आली व म्हणाली, “हे प्रभु हे बालक माझ्या डोळ्यांचा एकमेव प्रकाश आहे, तु त्याला जिवंत कर !” त्यावर स्वामीजी म्हणाले की सर्व काही देवाच्या इच्छेने होईल. तुम्ही-आम्ही यावर काहीही करु शकत नाही. तसेच तू निराश नको होऊस, तुला भविष्यात अजुन एक पुत्ररत्न प्राप्त होईल, निश्चिंत रहा. हे ऐकून ती माता निघुन गेली, पुढे काही वर्षांनी त्या मातेला पुत्ररत्न झाले व ती आनंदीत झाली व स्वामीजींचे आभार मानले.
भारत-पाकिस्तान फाळणीनंतर स्वामीजी भारत भूमी मध्ये आले व उल्हासनगर महाराष्ट्र येथे प्रेम प्रकाश आश्रमाची स्थापना केली. जेथे ते दररोज सत्संग करायचे, तहानलेल्यांची तहान भागवायचे. स्वामीजी म्हणजे दया, प्रेम, करुणा यांची सर्वगुण संपन्न मूर्ती होती. त्यांच्या दर्शनाने सर्व दुःख दूर व्हायचे. स्वामीजी भक्तांच्या सेवेत सकाळ पासुन ते रात्री बारा एक वाजेपर्यंत मग्न रहायचे. त्यांची वाणी मधुर होती. ती भक्तांना आकर्षित करायची.
स्वामीजी जितके प्रेम मनुष्या जातीवर करत होते, तितकेच ते पशुपक्षांवर देखील करायचे. स्वामीजी जेथे कुठे प्रवचन करायला जायचे तेथे ते नेहमी आपल्या प्रवचनात पशु पक्षी जीवनांवर प्रेम तसेच मांस दारु यांचा त्याग करण्याचे आवाहन करीत असे.
एकदा असे झाले की, स्वामीजींना एका भक्ताने पत्र पाठवले व त्यात असे नमूद होते की, गांधीनगर कोल्हापुर येथे शाही विवाह सोहळा होणार असुन तीस-चाळीस बकऱ्यांची कत्तल होणार आहे. स्वामीजींना पत्र मिळताच त्यांनी त्या रात्रीचे रेल्वेगाडी पकडली व तत्काळ गांधीनगर कोल्हापुर येथे गेले आणि होणाऱ्या पशु बळीची अघोरी पध्दत बंद केली.
स्वामीजी विद्वान, ज्ञानी असुन देखील नम्रतेचे प्रतीक होते. स्वामीजींच्या आशिर्वादाने असंभव गोष्टी संभव होऊन पूर्णत्वास जात असत. स्वामीजी स्वतःला कर्मठ समाजसेवी समजून लोकांचे दुःख ते आपले दुःख समजून सेवा करीत असते.
सन १९६९ मध्ये बिहारमध्ये दुष्काळ पडला होते. मनुष्य-प्राणी यांचे अन्न पाण्याविना जीवन जगणे कठीण झाले होते, अशा वेळी स्वामींनी स्वतः तेथे जाऊन बुध्दगयाला जाऊन मदत केंद्र स्थापन केले व भुकेलेल्या अन्नपाण्याची मदत पुरविली. तसेच कोयना महाराष्ट्र भुकंपग्रस्त, सुरत पूरग्रस्त यांना देखील स्वामींनी मदत पुरविली आहे. गरिब विद्यार्थ्यांना पुस्तके, वस्त्रे दिली. वृध्दाश्रम चालविले.
स्वामीजींच्या प्रयत्नाने त्यावेळेस पंधरा लाख रुपये खर्च करुन सर्वानंद हॉस्पिटलची स्थापना केली गेली. आज या माध्यमातुन हजारो-लाखो गरिब लोकांच्या रोगांचे निदान होऊन अगदी माफक दरात उपचार होत आहे. तसेच डोळ्यांचे हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे माफक दरात उपचार केले जातात.
स्वामीजींच्या प्रेरणेने उल्हासनगर – ४ येथे स्मशान भूमी बनविण्यात आली आहे. असे स्वामी प्रकाशजी महाराज हे गो – माता सेवक तसेच प्रखर राष्ट्रभक्त तसेच थोर समाजसुधारक देखील होते.
स्वामी शांती प्रकाशजी महाराज यांचे सिंगापुरला जात असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने विमानातच दि. १५ ऑगस्ट १९९३ रोजी निधन झाले. सदर घटनेनंतर स्वामींचे पार्थिव शरीर उल्हासनगर येथे स्वामी शांती प्रकाश या त्यांच्या नावे असलेले उल्हासनगर – ४ येथील आश्रमात आणण्यात आले व तिथेच त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.
स्वामीजींच्या मृत्यू पश्चात आज रोजी आश्रमात स्वामीजींची भव्यदिव्य अशी समाधी बांधण्यात आली असून तसेच भाटीया चौकात देखील भव्यदिव्य असा पुतळा उभारण्यात आला आहे. स्वामी शांती प्रकाश ट्रस्ट मार्फत विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. हायस्कूल (शाळा), नारी शाळा (विधवा महिलांसाठी शाळा) उघडण्यात आलेल्या आहेत. त्या माध्यमातुन आज कित्येक गोरगरिब कुटूंबातील मुलं उच्चशिक्षित होत आहेत.
स्वामीजींच्या ट्रस्टमार्फत गौशाळा केंद्र उभारण्यात आले आहेत. आज या ठिकाणी साधारणतः १५०० गाईंचे (गौसंगोपन) पालन पोषण ट्रस्ट मार्फत केले जात आहेत. असेच गोमाता संगोपन केंद्र (गौशाळा केंद्र) नाशिक या ठिकाणी २००० गाईंचे गौशाळा केंद्र उभारलेले आहे.
स्वामी शांती प्रकाश आश्रम, उल्हासनगर – ४ येथे योगा केंद्र उभारण्यात आले आहे तसेच कम्युनिटी हॉलचे निर्माण करण्यात आले आहे. आज या कम्युनिटी हॉलमध्ये कित्येक गोरगरिबांच्या मुलामुलींचे लग्नविधी मोठ्या थाटा-माटात आनंदाने साजरे करण्यात येतात. तसेच आश्रमामध्ये जनता जनार्दन परिषदेच्या माध्यमातुन गोर गरिब जनतेला मोफत रेशन, अन्नधान्य, औषध तसेच वैद्यकीय उपचार, लग्न सोहळ्यासाठी आर्थिक सहाय्य देखील केले जाते.
आज स्वामीजींच्या आशिर्वादाने भारतातील अहमदाबाद, कोल्हापुर, सुरत, वृंदावन, हरिद्वार इत्यादी शहरामध्ये आश्रमाची शाखा असून या आश्रमामध्ये भव्य असे सत्संग हॉल आहे.

लेखन सहकार्य पत्रकार राजू गायकवाड

दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!