नांद्री विकास मंचतर्फे जिल्हा परिषद शाळेतील ४० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप
अमळनेर : विक्की जाधव.
रोजगार व व्यवसायाच्या निमित्ताने शहरात स्थायिक झालेल्या नांद्री गावातील तरुण सुपुत्रांनी आपल्या जन्मभूमीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्र येत ‘नांद्री विकास मंच’ ची स्थापना केली आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करत मंचाच्या माध्यमातून विविध सामाजिक व ग्रामविकासाच्या उपक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे.
अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर स्थापन झालेल्या या मंचाच्या वतीने देशात सुरू असलेल्या ‘सेवा सप्ताहा’चे औचित्य साधून ३ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद शाळा, नांद्री येथील सुमारे ४० गरजू विद्यार्थ्यांना स्वखर्चाने शालेय उपयुक्त साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यापुढे गावातील शेती, पाणी, स्वच्छता आणि व्यसनमुक्ती या विषयांवर सातत्याने काम करण्याचा संकल्प मंचाने केला आहे. विशेषतः संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारण व ग्रामविकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे.
यासाठी सीएसआर फंड, लोकवर्गणी आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून नाला खोलीकरण तसेच पाणलोट बंधारे उभारण्याचे उपक्रम आगामी काळात राबविण्यात येणार असल्याचे मंचाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नांद्री विकास मंचाच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत व कौतुक केले.