रेशन प्रकरणात पुरवठा अधिकारी रुकसाना शेख यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; पत्रकार विक्की जाधव यांची प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील नगाव खुर्द येथील रेशन दुकान क्रमांक १५२ संदर्भात सप्टेंबर २०२६ महिन्याचे धान्य लाभार्थ्यांना मिळाले नसल्याची तक्रार समोर आल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. तक्रारीच्या अनुषंगाने पुरवठा अधिकारी रुकसाना शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यानंतर झालेल्या कार्यवाहीबाबत ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे पुरवठा अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

तक्रारीनुसार, काही लाभार्थ्यांचे अंगठे घेण्यात आले; मात्र त्यांना सप्टेंबर महिन्याचे धान्य मिळाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच तपासणीदरम्यान रेशन गोदामात धान्याचा साठा आढळून आल्याचेही सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ई-पॉस मशीनवरील नोंदी, स्टॉक रजिस्टर, धान्य प्राप्ती-वितरणाची कागदपत्रे आणि प्रत्यक्ष साठा यांची सखोल पडताळणी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

दरम्यान, पुरवठा अधिकारी रुकसाना शेख यांच्या कार्यवाहीबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष तथा, पत्रकार विक्की जाधव यांनी अमळनेरचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. संबंधित प्रकरणात अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत का, तसेच रेशन दुकानदाराशी कोणते आर्थिक किंवा अन्य हितसंबंध आहेत का, याबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ किंवा स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी पत्रकार विक्की जाधव यांनी केली आहे. चौकशीत कोणत्याही प्रकारचा नियमभंग किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, तसेच पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळाले आहे की नाही, याचीही खातरजमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.