दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन; तातडीच्या मदतीसह कर्जमाफीच्या मागणीचे निवेदन
अमळनेर : विक्की जाधव.
राज्यातील अनेक भागांमध्ये अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, कर्जमाफी, पीकविमा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून, सोमवार २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्याची भूमिका संघटनेने जाहीर केली आहे.
संघटनेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १ लाख रुपयांची नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे विशेष अनुदान द्यावे, सन २०२४ व २०२५ मधील प्रलंबित पीकविमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, तसेच पात्र शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा विविध मागण्या मांडल्या आहेत. कर्जाच्या थकबाकीमुळे शेतकऱ्यांचे CIBIL खराब होऊ नये यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यासोबतच शेतमजूर व भूमिहीन कुटुंबांसाठी स्वतंत्र विशेष आर्थिक पॅकेज, दुष्काळग्रस्त भागातील पशुधनासाठी चारा छावण्या आणि नागरिक व पशुधनासाठी पाण्याची तातडीने व्यवस्था, तसेच दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. आता शासन या मागण्यांवर कोणता निर्णय घेते आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.