गेल्या वर्षी महापुरानं उध्वस्त केलं, अन् आता दुष्काळानं कंबरडं मोडलं…!

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-09-28 at 6.11.21 PM

गेल्या वर्षी महापुरानं उध्वस्त केलं, अन् आता दुष्काळानं कंबरडं मोडलं…!

गतवर्षीच्या नुकसानीची मदत अजून कागदावरच; यंदा पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी दुहेरी संकटात

माढा / प्रतिनिधी अजिनाथ कनिचे
गतवर्षी २१ सप्टेंबर व २२ सप्टेंबर रोजी पावसानं अक्षरशःकहर केला होता… २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर च्या दरम्यान सीना नदीला तीन वेळा महापूर आला होता अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत उभं पीक वाहून गेलं.शेतातील माती अक्षरशः पिकांसह खरडून गेली,बांध फुटले,विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ गेला,शेतीचं मोठं नुकसान झालं.त्यावेळी मंत्र्यांची पूर्वग्रस्त भागात दौरे झाले शासनाकडून मदतीची आश्वासनं मिळाली.पंचनामे झाले,घोषणा झाल्या; पण मदतीची वाट पाहता-पाहता वर्ष ओलांडलं अद्यापही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेतच आहे.शेतकऱ्यांच्या जखमेवरची खपलीही सुकली नाही.तोच यंदा पावसानं पाठ फिरवली अन् दुष्काळानं शेतकऱ्यांच्या उरावर नवं संकट आणून ठेवलं.
मागच्या वर्षी महापुरानं कंबरडं मोडलं आणि यंदा दुष्काळानं हातपाय गाळायला लावले,अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. एक वर्ष पाण्यानं नेलं,तर दुसरं वर्ष पाण्याअभावी पिकं करपण्याच्या वाटेवर आहेत.शेतीत पैसा ओतूनही उत्पन्नाची खात्री नाही. बियाणं,खतं,औषधं,मशागत, मजुरी आणि पाण्यासाठी केलेला खर्च वाढतच चालला आहे; मात्र हातात येणारं उत्पन्न दिवसेंदिवस घटत आहे.

WhatsApp Image 2026-09-28 at 6.11.22 PM

गतवर्षीच्या अतिवृष्टी-महापुरानंतर शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र, “आज ना उद्या मदत मिळणार” या आशेवर दिवस ढकलणाऱ्या शेतकऱ्यांना आता ‘कधी मिळणार?’ हा सवाल सतावत आहे.अनेक शेतकऱ्यांच्या मते, नुकसानभरपाईबरोबरच शेतीची झालेली धूप,फुटलेले बांध,खराब झालेले शेतरस्ते आणि नदीकाठच्या भागांतील संरक्षणात्मक उपाययोजनांकडेही अपेक्षित गांभीर्याने पाहिले गेले नाही.
आता यंदाच्या दुष्काळाने परिस्थिती आणखी बिकट केली आहे.पाऊस लांबल्याने विहिरींची पातळी खालावली,बोअरवेलचा आधार कमी झाला आणि पिकांची वाढ खुंटली आहे.काही ठिकाणी पिकं माना टाकू लागली आहेत. शेतात पीक उभं असलं तरी त्याला जगवण्यासाठी पाणी नाही; घरात जनावरं असली तरी त्यांच्यासाठी चारा-पाण्याची मोठी भ्रांत निर्माण झाली आहे.

WhatsApp Image 2026-09-28 at 6.12.34 PM

शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय,पण सरकारी यंत्रणांच्या फाईली मात्र फिरतच आहेत,अशी संतप्त भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे.आपत्ती आली की पंचनामे,आश्वासनं आणि बैठकांचा धडाका; पण प्रत्यक्ष मदतीची वेळ आली की शेतकऱ्याला कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात अशी खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
शेतकऱ्यांचा प्रश्न केवळ एका हंगामाच्या नुकसानीपुरता मर्यादित राहिलेला नाही.मागच्या वर्षीचं नुकसान भरून निघालं नाही आणि यंदाच्या दुष्काळाचा खर्च डोक्यावर आला आहे.कर्जाचा डोंगर वाढतोय,उत्पादन घटतंय आणि शेतीचा खर्च वाढतोय.अशा परिस्थितीत ‘शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभा आहोत’च्या घोषणा पुरेशा नाहीत;तर शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष मदत पोहोचविण्याची गरज आहे.

WhatsApp Image 2026-09-28 at 6.11.22 PM (1)

आता आश्वासन नको,थेट बांधावर मदत हवी!
गतवर्षीच्या महापुरातील नुकसानग्रस्तांना प्रलंबित मदत तातडीने द्यावी,यंदाच्या दुष्काळाची वस्तुनिष्ठ पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी,पाणी व चाऱ्याचे नियोजन करावे तसेच महापूर आणि दुष्काळ या दोन्ही संकटांना तोंड देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
‘आश्वासनांच्या पावसाने शेतं भिजत नाहीत आणि घोषणांनी पिकं जगत नाहीत’— आता शासनाने कागदावर नव्हे,तर प्रत्यक्ष शेताच्या बांधावर उतरून निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

WhatsApp Image 2026-09-28 at 6.13.20 PM

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!