लोंढवे फाट्याजवळ भीषण अपघात; मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर तालुक्यातील लोंढवे फाट्याजवळ हॉटेल रुद्राक्षी परिसरात अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहन चालक अर्जुन हिरामण लोखंडे (रा. राजे संभाजी नगर) यांचा मृत्यू झाला. ही घटना २८ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन लोखंडे हे त्यांच्या मोटरसायकल क्रमांक एमएच ५४ ए ४८६८ वरून जात असताना लोंढवे फाट्याजवळ हॉटेल रुद्राक्षी परिसरात अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. धडकेनंतर ते मोटरसायकलसह रस्त्यावर कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघातानंतर धडक देणारे वाहन घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू असून, अपघातास नेमके कारण आणि अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.