चोपडा रोडवरील खदाणीत पिता-पुत्र पडले; अग्निशमन दलाच्या तत्परतेने जीव वाचले
अमळनेर : विक्की जाधव.
गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी चोपडा रोड येथील खदाणीजवळ गणपती विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळी गणपती विसर्जन करत असताना एका नागरिकाचा अचानक पाय घसरला. वडिलांनी मुलाचा हात धरलेला असल्याने अंदाजे १० ते ११ वर्षांचा मुलगाही त्यांच्यासोबत खदाणीतील पाण्यात पडला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ धावपळ उडाली.
घटना लक्षात येताच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अत्यंत सतर्कता आणि समन्वयाने प्रयत्न करत पथकाने पाण्यात पडलेल्या पिता-पुत्राला सुखरूप बाहेर काढले. वेळेत मदत मिळाल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाची पथके तैनात असल्याने आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत मिळू शकली. या बचावकार्यात संबंधित कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता आणि कार्यतत्परता महत्त्वपूर्ण ठरली. त्यांच्या समन्वयामुळे पिता-पुत्राला वेळीच सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.