काँक्रिटीकरणानंतर आठवडाभरातच रस्त्याला मोठ्या भेगा; पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले
(निलेश गायकवाड)
भिगवण (प्रतिनिधी) – भिगवण शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून नुकतेच काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या मुख्य रस्त्याची अवघ्या काही दिवसातच चाळण झाली आहे. नव्या सिमेंट रस्त्याला ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अखेर आज पाहणीसाठी आलेल्या अधिकारी आणि ठेकेदाराला संतप्त गावकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले.
उद्घाटनाआधीच निकृष्ट कामाचे पितळ उघडे –
सार्वजनिक निधीतून करण्यात आलेल्या या सिमेंट रस्त्याचे अद्याप अधिकृत लोकार्पणही झालेले नाही, तोवरच रस्त्याच्या पृष्ठभागावर मोठे तडे गेले आहेत. काँक्रिटीकरणात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असून, आवश्यक असलेली क्युरिंग (पाणी मारण्याची प्रक्रिया) व्यवस्थित न केल्यामुळेच रस्ता तडकला असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या भेगांमुळे अपघाताची शक्यता असून पावसाळ्यात रस्ता पूर्णपणे उखडण्याची भीती आहे.
अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी सुनावले –
या प्रकाराची तक्रार झाल्यानंतर आज संबंधित विभागाचे अधिकारी पाहणीसाठी भिगवणमध्ये आले असता, संतप्त गावकऱ्यांनी त्यांना चांगलेच सुनावले. यावेळी अधिकारी कुठेतरी ठेकेदाराला पाठीशी घालतात असे चित्र दिसत होते, असा आरोप ग्रामस्थांनी केला.
गावकऱ्यांनी अधिकारी आणि ठेकेदाराला घेराव घालत, कोट्यवधींचा निधी असा वाया कसा घालवला, असा थेट सवाल केला. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यापुढे अधिकाऱ्यांनी सारवासारव करत “येणाऱ्या आठ दिवसात दुरुस्ती करून देतो” असे आश्वासन दिले.
नागरिकांची मागणी –
केवळ डागडुजी करून हा प्रश्न सुटणार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या अशा –
१. या रस्त्याच्या कामाचे स्वतंत्र यंत्रणेकडून तांत्रिक ऑडिट करावे.
२. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे व त्याच्याच खर्चाने रस्ता पुन्हा बनवून घ्यावा.
३. दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी.
आठ दिवसात दर्जेदार काम न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.