भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी: हिट अँड रनचा ६ दिवसात छडा, आरोपी गजाआड
( निलेश गायकवाड)
भिगवण (प्रतिनिधी) – अपघात करून पळून जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाचा सखोल तपास करत भिगवण पोलिसांनी अवघ्या ६ दिवसात गुन्हा उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
काय घडले होते?
दि. १३/०९/२०२६ रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास मौजे शेटफळहाडे, ता. इंदापूर येथे बारामती-भिगवण रोडवर कोठारी फार्म जवळ अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून बुलेट गाडी क्र. MH 42/BT 0007 ला जोरदार धडक दिली.
या अपघातात बुलेटस्वार साहिल प्रवीण भोसले, वय २५ वर्षे, रा. उध्दट, ता. इंदापूर हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात चालक वाहनासह पळून गेला होता. याबाबत भिगवण पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. २३०/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(ए), १२५(बी) व मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वर्षभरापूर्वी अपघातात आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या तरुण मुलाचाच अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात मोठा संताप व्यक्त होत होता.
सीसीटीव्ही फुटेज नाही, तरीही तपास
रात्रीची वेळ असल्याने सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट नव्हते. ग्रामीण भाग असल्याने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
मात्र, भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी तपास पथक तयार करून अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे आदेश दिले. पथकाने अत्यंत सनोटीने व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने माहिती काढून अपघात करून पळून गेलेले वाहन पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची क्रॉस गाडी क्र. MH 42/AS 8123 असल्याचे निष्पन्न केले.
तपासाअंती चालक विरेंद्र मनोहर सोनवणे, वय ४७ वर्षे, रा. मोतीबाग, गुणवडी, ता. बारामती याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक
सदरची कामगिरी मा. संदीप सिंह गिल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, मा. चैतन्य कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ शेंडगे, सहा. पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार नानासाहेब सूर्यवंशी, रामदास कने, सचिन पवार, योगेश कुलकर्णी, तुषार रायकर, दत्तात्रय गवळी यांनी केली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार नानासाहेब सूर्यवंशी हे करीत आहेत.