भिगवण महाविद्यालयात क्रीडा विभागाचे तीनतेरा; तीन वर्षे विद्यार्थी कुस्ती स्पर्धेपासून वंचित, फिजिकल डायरेक्टरचे पदच रिक्त
(निलेश गायकवाड)
भिगवण (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व असताना, भिगवण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मात्र क्रीडा विभागाचा बोजवारा उडाल्याचा गंभीर आरोप पालकांकडून होत आहे.
महाविद्यालयातील इयत्ता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांपासून शालेय कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचा दावा पालकांनी केला आहे. यामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फिजिकल डायरेक्टरचे पद अनेक वर्षांपासून रिक्त
या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक किनार आहे. महाविद्यालयातील फिजिकल डायरेक्टर (क्रीडा संचालक) पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे.
प्रश्न असा आहे की, जर महाविद्यालयात कायमस्वरूपी क्रीडा संचालकच नसेल तर –
१) विद्यार्थ्यांना स्पर्धांची माहिती कोण देतो?
२) नोंदणी, कागदपत्रे आणि मार्गदर्शनाची जबाबदारी कोणाची?
३) क्रीडा विभागाचा कारभार नेमका चालवतो तरी कोण?
११ वी – १२ वी हे वय विद्यार्थ्यांच्या क्रीडा करिअरसाठी सुवर्णकाळ असतो. या वयातच जर संधी नाकारली गेली तर विद्यार्थ्याने आपले क्रीडा कौशल्य दाखवायचे कुठे?
पालकांच्या जाबानंतर चूक मान्य केल्याचा दावा
पालकांनी याबाबत महाविद्यालय प्रशासनाकडे विचारणा केली असता, महाविद्यालयाने आपली चूक मान्य केल्याचा दावा पालकांनी केला आहे. मात्र केवळ “चूक झाली” म्हणून हे प्रकरण संपणार का? गेल्या तीन वर्षात ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, त्याची भरपाई कोण करणार? याची जबाबदारी निश्चित कधी होणार? असे संतप्त सवाल पालक विचारत आहेत.
पालकांची मागणी –
१) मागील तीन वर्षातील क्रीडा विभागाच्या कामकाजाची सखोल चौकशी व्हावी.
२) विद्यार्थ्यांना स्पर्धेपासून वंचित ठेवण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी.
३) रिक्त असलेले क्रीडा संचालक पद तातडीने भरावे.
४) यापुढे प्रत्येक क्रीडा स्पर्धेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावी.
शिक्षणासाठी महाविद्यालय निवडताना पालक क्रीडा सुविधांचाही विचार करतात. ज्या महाविद्यालयात क्रीडा संचालकच नाही, तिथे आपल्या पाल्याच्या क्रीडा भवितव्याचे काय? असा प्रश्न आता पालकांसमोर उभा राहिला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर महाविद्यालय प्रशासन आता काय भूमिका घेते आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय याची दखल घेते का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.