संत सखाराम माऊली मित्र मंडळाचा अनोखा देखावा; चाफेकर बंधूंच्या क्रांतिकारी पर्वाची आठवण
अमळनेर : विक्की जाधव.
गणेशोत्सव म्हणजे केवळ भक्ती आणि उत्सव नव्हे, तर आपल्या इतिहासाची आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांची आठवण जागविण्याचे प्रभावी माध्यमही ठरू शकते, याचा प्रत्यय संत सखाराम माऊली मित्र मंडळाने साकारलेल्या सजीव देखाव्यातून येत आहे. मंडळाच्या वतीने चाफेकर बंधूंचे देशासाठीचे योगदान आणि ब्रिटिश अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँडवरील ऐतिहासिक हल्ल्याचा प्रसंग देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या असंख्य भाविकांना या देखाव्यातून इतिहासातील एका महत्त्वपूर्ण पर्वाची आठवण करून देण्यात येत आहे.

वडील हरिपंत चाफेकर पुणे आणि मुंबई येथे हरिकथा सांगत असत. बालवयात दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हे तिन्ही भाऊ वडिलांना कीर्तनात मदत करत होते. पुढे देशातील राजकीय परिस्थिती आणि ब्रिटिश सत्तेच्या धोरणांमुळे तिन्ही भाऊ क्रांतिकारी विचारांकडे वळले. पुण्यात प्लेगची साथ आली असताना ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या सक्तीच्या उपाययोजनांमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर चाफेकर बंधूंनी ब्रिटिश सत्तेविरोधात संघर्षाची भूमिका घेतल्याचा इतिहास या देखाव्यातून मांडण्यात आला आहे.

२२ जून १८९७ रोजी गणेशखिंड परिसरात वॉल्टर चार्ल्स रँडवर झालेल्या हल्ल्याचा प्रसंग, त्यानंतरची कारवाई आणि चाफेकर बंधूंचे बलिदान अशा घटनांना सजीव स्वरूप देण्यात आले आहे. देखाव्यातील प्रत्येक प्रसंगातून त्या काळातील वातावरण उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, इतिहासातील घटना केवळ पुस्तकात न राहता नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात, हा मंडळाचा उद्देश आहे.
संत सखाराम माऊली मित्र मंडळाच्या असंख्य तरुण कार्यकर्त्यांनी मेहनत आणि कल्पकतेतून हा देखावा साकारला आहे. गणेशभक्त दर्शनासाठी येताना काही क्षण या देखाव्यासमोर थांबून चाफेकर बंधूंच्या संघर्षाची आणि देशासाठी केलेल्या त्यागाची माहिती घेत आहेत. त्यामुळे भक्तीच्या वातावरणासोबतच इतिहासाची जाणीव करून देणारा हा सजीव देखावा अमळनेरच्या गणेशोत्सवातील लक्षवेधी आकर्षण ठरत आहे.