अमळनेर शहरालगत पुन्हा बिबट्याची दहशत; ढेकू रोड गलवाडे कडे जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी.
अमळनेर : विक्की जाधव
शहरालगत बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आल्याने ढेकू रोड परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेताजवळ गणेश देसले यांना बिबट्या अचानक दिसला. सुरक्षित अंतर राखत त्यांनी बिबट्याचा फोटो काढला. त्यानंतर त्याला हुसकावण्याचा प्रयत्न होताच बिबट्याने तेथून धूम ठोकत ढेकू-गलवाडे रस्त्याच्या दिशेने धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच देसले यांनी तातडीने ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांनी वनपाल गुलाब पिंजारी यांना घटनेची माहिती दिल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. बिबट्याचे छायाचित्र समोर आल्याने त्याच्या वावराबाबत गांभीर्य वाढले असून वनविभागाकडून परिसरात पाहणी करण्यात येत आहे.
दरम्यान, यापूर्वीही अमळनेर शहरालगत बिबट्याच्या वावर असल्याच्या अनेक घटना समोर आल्या ने त्यानंतर आता पुन्हा ढेकू रस्त्यावर बिबट्याची एन्ट्री झाल्याने पिंपळे रोड, ढेकू रोड, पोलीस स्टेशन, आयटीआय कॉलेज परिसर तसेच शेतवस्तीवरील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेताकडे जाणे टाळावे आणि बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा हुसकावण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभाग अथवा पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.