श्री साईबाबा पुण्यतिथी महोत्सव समितीच्या ३० व्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी; नव्या कार्यकारिणीची निवड
अमळनेर : विक्की जाधव.
श्री साईबाबांच्या भक्तीमय जयघोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात श्री साईबाबा पुण्यतिथी महोत्सव समितीचा ३० वा वर्धापन दिन साजरा करण्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी समितीची वार्षिक बैठक व वनभोजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी साईभक्तांच्या उपस्थितीत आगामी वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
समितीच्या अध्यक्षपदी हिरालाल रामलाल महाजन, उपाध्यक्षपदी लक्ष्मण रघुनाथराव साळुंखे, सचिवपदी वासुदेव भटू पाटील, तर खजिनदारपदी अनिल चिमणराव महाजन यांची निवड करण्यात आली. महिला मंडळाच्या अध्यक्षपदी वैशालीताई बडगुजर व उपाध्यक्षपदी विमलबाई प्रल्हाद कोळी, तर युवक मंडळाच्या अध्यक्षपदी अमोल भास्कर सोनवणे आणि उपाध्यक्षपदी सागर मोहन पाटील यांची निवड करण्यात आली.
पदाची हाव किंवा मानपानाची अपेक्षा न ठेवता केवळ साईबाबांची सेवा आणि भक्तीमय वातावरणात दहा दिवसांचा उत्सव यशस्वी करण्याचा समितीचा संकल्प यावेळी अधोरेखित करण्यात आला. अमळनेर शहरातील आदर्श उत्सव समिती म्हणून ओळख निर्माण केलेल्या या समितीने यंदाही साईमहिमा जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी भव्य कीर्तन महोत्सव आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. समितीच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त साईभक्तांनी देणगी व सहकार्याच्या माध्यमातून उत्सवाला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित सर्व साईभक्तांचे समितीतर्फे आभार मानण्यात आले.