करमाळा प्रतिनिधी(सागर गायकवाड) : करमाळा शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा केंद्रबिंदू असलेल्या किल्ला विभागातून गणेश विसर्जन मिरवणूक पुन्हा एकदा जुन्या पारंपरिक मार्गाने काढण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. मध्यंतरीच्या काळात सुरक्षेच्या कारणास्तव आणि इतर बदलांमुळे मिरवणूक मार्गात बदल करण्यात आला होता, मात्र आता बदलत्या परिस्थितीनुसार पुन्हा जुनी परंपरा सुरू करावी, असा सूर उमटत आहे.
मानाचा पहिला गणपती असलेल्या ‘श्री देवीचा माळचा गणपती’ची विसर्जन मिरवणूक पूर्वी किल्ला विभागातील नगर परिषद कार्यालयापासून काढण्यात येत असे. मात्र, मध्यंतरी किल्ल्याच्या भिंतीची झालेली पडझड आणि डीजेचा अतिदणदणाट यामुळे मिरवणूक मार्गात बदल करण्यात आला.
सध्या शहरातील सर्व विसर्जन मिरवणुका ‘सिद्धार्थ तालीम’ मार्गे किल्ला वेशीत प्रवेश करतात. या वेळी परंपरेनुसार मारुती मंदिराला फेरी मारून पुन्हा मिरवणूक किल्ला वेशीच्या कमानीसमोर येते. तोपर्यंत मागील मिरवणुका जागेवरच थांबविल्या जातात. तसेच, महात्मा गांधी विद्यालयजवळ काही मंडळे लेझीम, झांज आणि टिपऱ्या यांसारखे पारंपरिक खेळ खेळतात. परंतु त्यानंतरचा थेट ‘डाव’ किल्ला वेस येथे खेळला जातो. दोन्ही ठिकाणांमधील अंतर जास्त असल्यामुळे कार्यकर्त्यांना आपल्या कला सादर करण्यासाठी प्रेक्षक किंवा नागरिक उपस्थित नसतात.
नगरपरिषद कार्यालयासमोरून मिरवणुका काढल्यास किल्ला विभागातील नागरिकांना थेट आपल्या दारात मिरवणुकीचा आनंद घेता येईल. तसेच ऐतिहासिक आणि जुन्या पारंपरिक मार्गाची पुनरावृत्ती होऊन परंपरेचे जतन होईल. त्याचप्रमाणे या मार्गाने मिरवणूक मार्गस्थ झाल्यास मारुती मंदिराला फेरी मारून किल्ला वेशीतून सहज पुढे जाता येईल, ज्यामुळे पोलीस प्रशासनावरील ताणही काही प्रमाणात कमी होईल.
सध्या डीजे आणि डॉल्बीवर बंदी घालण्यात आली असून, न्यायालयाच्या व प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व मंडळे शांततापूर्ण आणि डीजे-डॉल्बीमुक्त मिरवणुका काढत आहेत. त्यामुळे आता किल्ल्याच्या तटबंदीला किंवा ऐतिहासिक वास्तूस काहीही धोका निर्माण होणार नाही.
यासाठी नगरपरिषद प्रशासनाने नगरपरिषद कार्यालय ते शंकर सुरवसे यांच्या दुकानापर्यंतचा रस्ता जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने दगड, माती उचलून मोकळा करावा, अशी सूचना केली जात आहे. यामुळे रस्ता रुंद होऊन मिरवणूक कोणतीही अडचण न येता सुलभतेने मार्गस्थ होऊ शकेल.
प्रशासनाने यावर सकारात्मक विचार करून किल्ला विभागातून जुन्या पारंपरिक मार्गाने मिरवणूक सुरू करावी, अशी अपेक्षा गणेशभक्तांकडून व्यक्त केली जात आहे.