भिगवणच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात पँथर कुटुंबातील लेकीची नियुक्ती; डॉ. आनार्या मखरे यांचा चळवळीतील कार्यकर्त्यांकडून सत्कार
(निलेश गायकवाड)
भिगवण (प्रतिनिधी) – सामाजिक चळवळीचा वारसा लाभलेल्या कुटुंबातील डॉ. आनार्या राहुल मखरे यांची शासकीय ग्रामीण रुग्णालय, भिगवण येथे ‘मेडिकल ऑफिसर’ या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल भिगवण व परिसरातील चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला.
डॉ. आनार्या मखरे या स्मृतीशेष पँथर रत्नाकर तात्या मखरे यांची नात असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) प्रशिक्षण विभागाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख अँड. राहुलजी मखरे यांची कन्या आहेत.
पँथर रत्नाकर तात्या मखरे यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचित, शोषित समाजाच्या हक्कासाठी लढण्यात घालवले. त्याच सामाजिक बांधिलकीचा वारसा त्यांची नात डॉ. आनार्या पुढे चालवत असून, आता शासकीय सेवेतून ती गोरगरीब रुग्णांची सेवा करणार आहे, ही अभिमानाची बाब असल्याची भावना सत्कार प्रसंगी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
भिगवण ग्रामीण रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाल्याने परिसरातील रुग्णांना निश्चितच चांगल्या आरोग्य सेवा मिळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी भिगवण व भिगवण परिसरातील आंबेडकरी चळवळीतील, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी डॉ. आनार्या यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.