मध्यरात्री विनानंबर स्कॉर्पिओची पोलिसांकडून तपासणी; चालक मद्याच्या प्रभावाखाली
बारामती शहर पोलिसांची रात्रीची गस्त; वाहनाची कागदपत्रेही सादर न केल्याने गुन्हा दाखल
बारामती, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
शहरातील रात्रीची सुरक्षितता अधिक प्रभावी करण्यासाठी बारामती शहर पोलिसांकडून सुरू असलेल्या सतर्क पेट्रोलिंगदरम्यान नंबर प्लेट नसलेली काळ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आली. पोलिसांनी वाहन थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याच्याकडे आवश्यक वाहन कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यातच चालकाच्या तोंडातून मद्याचा वास येत असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत चालक मद्याच्या प्रभावाखाली असल्याचे निष्पन्न झाले.
ही कारवाई ५ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास खंडोबानगर, मोरगाव रोडवरील पेट्रोलपंपासमोर करण्यात आली.
🔸नंबर प्लेट नसल्याने पोलिसांना संशय
बारामती शहर पोलीस ठाण्याचे पथक मध्यरात्री शहर हद्दीत रात्रगस्त आणि पेट्रोलिंग करीत असताना मोरगाव रोडवर एक काळ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आली.
विशेष म्हणजे वाहनाच्या समोरील तसेच मागील बाजूस नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट दिसून आली नाही. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ वाहन थांबवून चालकाकडे चौकशी केली.
चालक कोठून आला, कोठे जाणार आहे, मध्यरात्री त्या परिसरात फिरण्याचे कारण काय, वाहन कोणाच्या मालकीचे आहे, याबाबत पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाची आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. मात्र, तपासणीदरम्यान चालकाला आवश्यक कागदपत्रे सादर करता आली नाहीत.
🔷तोंडाला मद्याचा वास; वैद्यकीय तपासणीतही स्पष्ट
चौकशीदरम्यान चालकाच्या तोंडातून मद्याचा उग्र वास येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे तो मद्याच्या प्रभावाखाली वाहन चालवत असल्याचा संशय पोलिसांना आला.
यानंतर चालकाला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी बारामती शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी सिल्वर ज्युबिली रुग्णालय, बारामती येथे पाठविण्यात आले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून चालक ‘Patient is under influence of Alcohol’ असल्याचा अभिप्राय नोंदविला.
🔴ऋषिकेश चिंचकरविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांच्या चौकशीत वाहन चालकाचे नाव ऋषिकेश जगन्नाथ चिंचकर (वय २५ वर्षे, रा. PDCC बँकेसमोर, दर्ग्याशेजारी, आमराई, बारामती) असे निष्पन्न झाले.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६४/२०२६ नोंद करण्यात आला आहे. मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम १३०, १७७, १५८ आणि १८५, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम १२२(घ) अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानदेव विष्णू क्षीरसागर करीत आहेत.
🟢रात्रीच्या गस्तीला संशयित वाहनांवर विशेष लक्ष
बारामती शहर पोलिसांनी रात्रीच्या गस्तीला अधिक प्रभावी स्वरूप दिले असून, विनाकारण फिरणारी संशयित वाहने, नंबर प्लेट नसलेली वाहने, वाहनांच्या कागदपत्रांमधील अनियमितता आणि मद्याच्या प्रभावाखाली वाहन चालविणाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
रात्रीची गस्त केवळ नियमित पेट्रोलिंगपुरती मर्यादित न ठेवता संशयित वाहनांची तपासणी, कागदपत्रांची पडताळणी आणि संशयित व्यक्तींची चौकशी यावर भर देण्यात येत आहे. संभाव्य गैरप्रकारांना वेळीच आळा घालणे आणि रस्ते सुरक्षित ठेवणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नागरिकांनी वाहन चालविताना वैध कागदपत्रे जवळ ठेवावीत, वाहनावर नियमानुसार नोंदणी क्रमांक प्रदर्शित करावा आणि मद्याच्या प्रभावाखाली वाहन चालवू नये, असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, पोलीस हवालदार यशवंत पवार आणि बारामती शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.