केकचा घास की आरोग्याला त्रास? राजस्थान स्वीट मार्ट चा केक खाल्ल्यानंतर दोघांची प्रकृती बिघडली..
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरातील ॲक्सिस बँकेशेजारी असलेल्या राजस्थान स्वीट मार्टमध्ये २९ रोजी रात्री साडेसातच्या सुमारास एका कुटुंबाने मुलाच्या वाढदिवसानिमित्त केक खरेदी केला. घरी वाढदिवस साजरा केल्यानंतर कुटुंबीयांनी हा केक खाल्ला. त्यानंतर परिवारातील दोन जणांना उलट्या होऊन प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्यावर दवाखान्यात उपचार घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर केकमुळेच त्रास झाला का? केकची गुणवत्ता तपासली जाणार का? असे प्रश्न शहरात उपस्थित होत असून, संबंधित विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ‘मार्मिक’ ने राजस्थान स्वीट मार्ट येथे जाऊन संबंधितांची बाजू जाणून घेतली. दुकानाचे मालक देवा पुरोहित यांनी संबंधित ग्राहकाने त्यांच्या दुकानातूनच केक खरेदी केल्याचे मान्य केले. मात्र, “केक खाल्ल्याने उलटी होत नाही; आम्हीही तोच केक खाल्ला आहे,” असा दावा त्यांनी केला. त्यामुळे ग्राहकाचा दावा आणि दुकानदाराची भूमिका यामध्ये नेमके सत्य काय, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणात केक खाल्ल्यानंतर नेमका कोणत्या कारणामुळे त्रास झाला, याची वैद्यकीय तपासणी तसेच केकचा नमुना तपासणी केल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन केकचा नमुना तपासावा आणि अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या या घटनेमुळे अमळनेरमध्ये ‘वाढदिवसाच्या केकचा घास पडला महागात?’ अशी चर्चा रंगली आहे.