COEP गैरकारभाराची बातमी दाखवल्याने ABP माझाच्या पत्रकारावर गुन्हा; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
(निलेश गायकवाड)
पुणे – सत्य समोर आणणे हा पत्रकारितेचा धर्म आहे, असे सांगत आमदार रोहित पवार यांनी पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावरील गुन्हा दाखल प्रकरणावरून सरकार आणि COEP प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.
ABP माझाचे निर्भीड पत्रकार मंदार गोंजारी यांनी COEP मधील कथित गैरकारभाराची बातमी समोर आणली होती. त्याबद्दलच त्यांच्यावर COEP प्रशासनाने गुन्हा दाखल केल्याचा आरोप आहे.
यावर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, “हा गुन्हा नसून हा त्यांच्या निष्पक्ष पत्रकारितेला मिळालेले मेडल आहे. हा गुन्हा कुणाच्या दबावामुळे दाखल केला हे यथावकाश पुढे येईलच. आम्ही सर्वजण पत्रकार मंदार गोंजारी यांच्या पाठीशी आहोत. कोणत्याही दबावाला न घाबरता हुकुमशाही वृत्तीच्या नाकावर टिच्चून भविष्यातही असंच सत्य मांडत रहा.”
दरम्यान, या घटनेमुळे पुणे विद्यापीठ वर्तुळात आणि पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या या हुकुमशाही भूमिकेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. हा पत्रकारितेचा गळा घोटण्याचा प्रयत्न असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.