करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- सोलापूर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या आदेशानुसार आणि तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निलज हद्दीतील श्री क्षेत्र संगोबा (आदिनाथ महाराज मंदिर परिसर) येथे ‘सुराज्य ग्राम मुक्काम मोहीम’ राबविण्यात आली. यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले की “शासकीय काम आणि सहा महिने थांब” ही जुनी म्हण खोटी ठरवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगितले.
तसेच या बाबत पुढे बोलताना तहसीलदार म्हणाल्या की. तालुका ठिकाणी नागरिकांचे हेलपाटे होऊ नयेत, यासाठी महसूल व शासकीय यंत्रणा स्वतः गावात दाखल झाली आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांचे विविध दाखले, रेशन कार्ड आणि प्रलंबित असलेले अनेक विषय जागेवरच मार्गी लावण्यासाठी अधिकारी कर्मचारी आले असून नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचवून त्यांना घरपोच किंवा गावाजवळच शासकीय सुविधा उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे ही तहसीलदार यांनी सांगितले.
सरपंच अंकुश शिंदे यांनी पानंद रस्त्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या. तसेच, तहसीलदार ठोकडे यांनी आजवर धाडसी कारवाई करीत अतिक्रमणे काढून रस्ते मोकळे केल्याबद्दल त्यांच्या कामाचे ग्रामस्थांच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले. मागील वर्षी आलेल्या पुराच्या संकटसमयी तहसीलदार ठोकडे यांनी दाखवलेली तत्परता आणि नागरिकांना दिलेला धीर याबद्दलही यावेळी आठवण काढत प्रशासनाच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थानी तहसीलदार ठोकडे यांच्या समोर निलज हद्दीतील अनेक समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने भूमी अभिलेख कार्यालया मधील कामातील दिरंगाई बाबत ची तक्रार आली. तसेच संगोबा येथील पिण्याच्या पाण्याची, वॉटर Atm कार्यान्वित नसल्याची व पोथरे – निलज रस्ता खुला करण्याबाबतची, पुरामध्ये एस टी स्टँड वाहून गेल्याची व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ची कनेक्शन न दिल्याची इत्यादी तक्रारी प्राप्त झाल्या. यावेळी प्राप्त तक्रारींवर तत्काळ तहसीलदार यांनी लागलीच संबंधित अधिकारी यांना कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले तसेच काही कामे स्वत लक्ष घालून पूर्ण करण्याची ग्वाही ग्रामस्थाना दिली.
यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी सर्व ग्रामस्थांना या मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले असून, प्रशासनाच्या या दारी येणाऱ्या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी केले. तसेच सदर कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य स्वप्नील काळे, सरपंच अंकुश गंगाराम शिंदे, पोलीस पाटील चित्रा राऊत, ग्रामपंचायत अधिकारी आर. के. हजारे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.