बळीराजासाठी खुशखबर! कर्जमुक्तीचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत मोठा दिलासा
(निलेश गायकवाड)
इंदापूर, दि. २५ – राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी खुशखबर दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 चा दुसरा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या दुसऱ्या टप्प्यात ६ लाख ३६ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल ५ हजार ८६ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
यापूर्वी पहिला हप्ता वितरित करण्यात आला होता. पहिला आणि दुसरा हप्ता मिळून आतापर्यंत एकूण १२ लाख ५८ हजार २४३ पात्र शेतकऱ्यांना १० हजार ११५ कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा निधी वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही योजना शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून पुन्हा उभारी देण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होत असल्याने राज्यभरातून समाधान व्यक्त केले जात आहे.