ब्रँडच्या नावाखाली 700 ते 800 कोटींचा कथित घोटाळा? पुणे, सोलापूर, नगर जिल्हा हादरणार?
(निलेश गायकवाड)
भिगवण (प्रतिनिधी) – एका प्रसिद्ध ब्रँडच्या नावाची सध्या पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. या ब्रँडच्या माध्यमातून तब्बल 700 ते 800 कोटी रुपयांचा कथित घोटाळा समोर येण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर ब्रँडकडून गुंतवणुकीवर आकर्षक टक्केवारी आणि पैसे दुप्पट-तिप्पट वाढवून मिळणार या अमिषाने अनेक सामान्य नागरिक, शेतकरी आणि तरुणांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेण्यात आली होती.
सुरुवातीला काही जणांना परतावा दिल्याने विश्वास संपादन करण्यात आला, मात्र गेल्या काही दिवसांपासून परतावा मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदारांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपले पैसे बुडणार की काय? या चिंतेने अनेक गुंतवणूकदार हवालदिल झाले असून “ब्रँड मात्र जोमात आणि गुंतवणूकदार कोमात” अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.
हा विषय आता काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर समोर येण्याची शक्यता असून जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये याबाबत कुजबुज सुरू आहे. नागरिकांनी अशा आकर्षक योजनांना बळी न पडता प्रशासनाकडे चौकशी करावी, असे आवाहन सुजाण नागरिकांकडून केले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार किंवा गुन्हा दाखल झालेला नाही, हा केवळ नागरिकांमधील चर्चेचा विषय असून सत्यता तपासणीनंतरच समोर येईल.