बारामती एमआयडीसी मध्ये भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत दोन महिलांचा जागीच मृत्यू, गुन्हा दाखल
(निलेश गायकवाड)
बारामती (प्रतिनिधी) – बारामती तालुक्यातील विमानतळ एमआयडीसी परिसरातील पेन्सिल चौक ते हिरकणी गोडाऊन रोडवर आज दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या किया सोनेट कारने स्कूटीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
याप्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४०५/२०२६ अन्वये बी.एन.एस. २०२३ चे कलम १०६, २८१, १२५(a), १२५(b) व मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके काय घडले?
फिर्यादी प्रदीप बबन लोंढे (वय ४८, रा. पिंपस, ता. फलटण) हे आपल्या स्कूटी (क्र. MH 14 DW 1531) वरून जात असताना मौजे ड्रीम प्लास्ट कंपनी समोर, हिरकणी गोडाऊन जवळ दुपारी १.२० वाजण्याच्या सुमारास पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या किया सोनेट कार (क्र. MH 42 BK 0707) ने त्यांच्या स्कूटीला जोरदार ठोकर दिली.
कार चालक शुभम शिवाजी खामकर (रा. पाटस, ता. दौंड) हा हयगयीने, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून गाडी चालवत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या अपघातात स्कूटीवरील फिर्यादी यांच्या पत्नी संगिता प्रदीप लोंढे (वय ३८) आणि नातेवाईक मनिषा बबन शिंदे (वय ४३, दोघी रा. पिंपरद, ता. फलटण) यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची नोंद बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे सायंकाळी १७.०७ वाजता स्टेशन डायरी नं. ३७/२०२६ अन्वये घेण्यात आली आहे.
पुढील तपास –
या गुन्ह्याची नोंद पो.हवा. चव्हाण (ब.नं. २८६) यांनी घेतली असून पुढील तपास ग्रेड पो.स.ई. श्रीरंग शिंदे हे करत आहेत. प्रभारी अधिकारी पो.नि. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
एमआयडीसी परिसरात भरधाव वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.