अमळनेरच्या बोरी मातेचा एक निस्वार्थ सेवक – श्री. अमृत जाधव
अमळनेर, २७ ऑगस्ट २०२६
संत सखाराम महाराजांच्या पावन नगरी अमळनेरमध्ये बोरी नदीच्या काठावरील श्री सखाराम समाधी मंदिर परिसराची स्वच्छता गेली अनेक वर्षे एकट्याने करणारा एक निस्वार्थ सेवक आहे. त्याचे नाव आहे श्री. अमृत जाधव (रा. वाडी चौक, अमळनेर).पावसाळ्यात बोरी नदीला पूर आल्यावर मोठमोठी झाडे, झुडपे, प्लास्टिक आणि विशेषतः दारूच्या बाटल्यांचे काचेचे तुकडे वाहत येतात. हे काचेचे तुकडे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या, लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या पायात रुततात. नदीचे पात्र घाणीने भरते आणि मंदिर परिसराचे पावित्र्य नष्ट होते. ही परिस्थिती पाहून श्री. अमृत जाधव यांनी कोणाचीही मदत न घेता, शासकीय निधी न मागता आणि प्रसिद्धीच्या हव्यासाशिवाय स्वतःच्या हाताने व स्वखर्चाने हे कचरा उचलण्याचे पवित्र काम हाती घेतले आहे. गेली अनेक वर्षे ते अविरतपणे ही सेवा करत आहेत.श्री. जाधव यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, “मी एकटा किती दिवस साफ करणार? माझ्यासारखे आणखी हात पुढे आले पाहिजेत. मंदिर परिसराच्या १०० मीटरपर्यंत कोणीही उघड्यावर घाण, कचरा टाकू नये. काही लोक मंदिर परिसरात येऊन दारू पितात आणि बाटल्या फोडून टाकतात. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे.”त्यांनी अमळनेर नगरपरिषदेकडे कळकळीची मागणी केली आहे की, मंदिर परिसरात त्वरित फलक लावण्यात यावेत. फलकावर “मंदिर परिसरात घाण, कचरा, दारूच्या बाटल्या टाकू नये, दारू पिऊ नये, विकू नये. हा नो-लिकर, नो-कचरा झोन आहे. नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई व दंड वसूल करण्यात येईल” अशी सक्त ताकीद असावी. तसेच नियमित स्वच्छता कर्मचारी नेमावेत आणि दारू पिऊन घाण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.हिंद सुदर्शन जनता पार्टी प्रेरित सेवा-विकास-एकता चळवळ, जन अभियान यांनी श्री. अमृत जाधव यांच्या या मागणीचे पूर्ण समर्थन केले आहे. पार्टीचे संस्थापक-अध्यक्ष जयेश भास्कर चौधरी यांनी सांगितले की, “हा केवळ एका व्यक्तीचा प्रश्न नाही, तर अमळनेरच्या सांस्कृतिक वारशाचा आणि श्रद्धेचा प्रश्न आहे. एक माणूस स्वखर्चाने नदी साफ करू शकतो, तर संपूर्ण अमळनेर मिळून शहर स्वच्छ, सुंदर आणि व्यसनमुक्त का करू शकत नाही?”त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, कचरा उघड्यावर टाकू नका आणि नदी ही आपली आई आहे, तिची स्वच्छता राखा. तसेच नगरपरिषदेला विनंती केली की, त्वरित फलक लावावेत, नियमित स्वच्छता व्यवस्था करावी आणि श्री. अमृत जाधव यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सहकार्य करावे.प्रत माहितीसाठी अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व अमळनेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांकडे पाठविण्यात आली आहे.
(निवेदक : जयेश भास्कर चौधरी, संस्थापक/अध्यक्ष, हिंद सुदर्शन जनता पार्टी, मो. ९५९५१७१९९२)