पुणे जिल्हा परिषदेत लिपिक व परिचर संवर्गाच्या पदोन्नत्या पारदर्शकपणे पूर्ण; संघटनेकडून प्रशासनाचे स्वागत
(निलेश गायकवाड)
भिगवण (प्रतिनिधी) – पुणे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने वर्ग-३ लिपिक संवर्ग आणि वर्ग-४ परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांची बहुप्रतिक्षित पदोन्नती प्रक्रिया नुकतीच पारदर्शक व न्याय्य पद्धतीने पूर्ण करण्यात आली. या निर्णयामुळे पात्र कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार न्याय मिळाल्याने महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, पुणे जिल्हा शाखेच्यावतीने प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहेत.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष इंद्रजित जाधव यांनी सांगितले की, या पारदर्शक प्रक्रियेमुळे वर्ग ३ व वर्ग ४ मधील अनेक कर्मचाऱ्यांना सेवेत पुढील पदावर जाण्याची संधी मिळाली असून कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. प्रशासनाने कोणताही भेदभाव न करता केवळ गुणवत्तेला आणि सेवाज्येष्ठतेला प्राधान्य दिल्याने ही प्रक्रिया आदर्शवत ठरली आहे.
या पदोन्नती प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विषय समित्यांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) यांनी विशेष पुढाकार घेतला.
“कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसारख्या संवेदनशील विषयात पारदर्शकता ठेवल्याबद्दल प्रशासनाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. भविष्यातही कर्मचाऱ्यांचे इतर प्रलंबित प्रश्न प्रशासनाने याच सकारात्मकतेने सोडवावेत,” अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष इंद्रजित जाधव यांनी व्यक्त केली.
यावेळी संघटनेचे सचिव मनोहर वन्नम, उमाकांत सूर्यवंशी, संगीता करंजकर, सुहास संचेती, किशोर कुलकर्णी, सनी शिवरकर, अजय वत्रे, शशी कालेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.