निमसाखर खून प्रकरणातील १८ महिन्यांपासून फरार असलेला आरोपी अखेर जेरबंद; वालचंदनगर पोलिसांची धडक कारवाई
(निलेश गायकवाड)
वालचंदनगर / बारामती (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यातील बहुचर्चित निमसाखर येथील उत्तम जाधव खून प्रकरणातील फरार आरोपीला अखेर वालचंदनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. गेले १८ महिने वेशभूषा बदलून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला सापळा रचून पकडण्यात वालचंदनगर पोलिसांना मोठे यश आले असून या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. संदीपसिंह गिल्ल आणि अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मा. गणेश बिरादार यांनी सर्व पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने वालचंदनगर पोलीस स्टेशनने फरारी आरोपी शोध मोहीम तीव्र केली होती.
अटक केलेल्या आरोपीचे नाव सोमनाथ बबन पवार, वय ३३ वर्षे, रा. कळंब, ता. इंदापूर, जि. पुणे असे आहे. हा आरोपी निमसाखर खून प्रकरणातील राजू भाळे टोळीचा सदस्य असून त्याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. अटकेच्या भीतीने तो सतत ठिकाण बदलत होता.
तपासादरम्यान सदर आरोपी हा गुपचूप कळंब परिसरात येणार असल्याची खात्रीशीर बातमी वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील अंमलदारांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने ठिकाणी वेशभूषा बदलून सापळा रचला आणि आरोपी कळंब मध्ये येताच त्याला शिताफीने ताब्यात घेऊन जेरबंद केले.
आरोपीस ताब्यात घेऊन वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे आणून सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला मा. विशेष मोक्का न्यायालय, शिवाजीनगर, पुणे येथे हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. ३१/०८/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
कौतुकास्पद कामगिरी –
ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस हवालदार आप्पा दराडे, किर्तीलाल गायकवाड, पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, अभिजीत कळसकर, राहुल माने यांनी केली आहे.
अनेक दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केल्याने वालचंदनगर पोलिसांच्या सतर्कता, धाडस आणि व्यावसायिक कौशल्याचे नागरिकांमधून विशेष कौतुक होत आहे.