ऑटोरिक्षा भाडेदरात १ सप्टेंबरपासून वाढ; पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रुपये
बारामती, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ऑटोरिक्षांच्या सुधारित भाडेदरास मान्यता दिली असून, १ सप्टेंबर २०२६ पासून नवीन भाडेदर लागू होणार आहेत. त्यानुसार पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रुपये, तर त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ऑटोरिक्षांसाठी रात्री १२ ते सकाळी ५ वाजेपर्यंत २५ टक्के अतिरिक्त भाडे आकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर महानगरपालिका क्षेत्राबाहेरील ग्रामीण भागातील ऑटोरिक्षांसाठी रात्री ११ ते सकाळी ५ या कालावधीत ४० टक्के अतिरिक्त भाडे आकारता येणार आहे.
याशिवाय पुणे व पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे असलेल्या ६० x ४० सेंटीमीटर आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या सामानासाठी ३ रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
🔸मीटर कॅलिब्रेशनसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत
सुधारित भाडेदर लागू झाल्यानंतर ऑटोरिक्षांच्या मीटरचे कॅलिब्रेशन करण्यासाठी २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतरही मीटर कॅलिब्रेशन न करणाऱ्या ऑटोरिक्षा चालक व मालकांवर नियमानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
🔷तात्पुरते टेरिफ कार्ड उपलब्ध होणार
ऑटोरिक्षा चालक तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत सुधारित भाडेदरानुसार तात्पुरते टेरिफ कार्ड तयार करण्यात येणार आहे. हे कार्ड २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत वैध राहणार असून, त्यानंतर या टेरिफ कार्डचा वापर करता येणार नाही.
प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे स्वीकारणे ऑटोरिक्षा चालकांसाठी बंधनकारक राहणार आहे. सुधारित भाडेदरामुळे प्रवाशांना नवीन दरानुसार भाडे आकारले जाणार असून, चालकांनी निर्धारित नियमांचे पालन करावे, असे बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी कळविले आहे.