करमाळ्यात श्रावणानिमित्त भक्तीचा मळा फुलला; पण लाऊडस्पीकरच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिक त्रस्त!

अपनी भाषा में पढ़े! Translate

24F1BBA7-F0BF-4D6E-B506-CE0909BA96F8

करमाळा | प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- पवित्र श्रावण महिन्याच्या आगमनाने संपूर्ण करमाळा शहर आणि तालुक्यात सध्या अभूतपूर्व आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी धार्मिक सप्ताह सुरू असून, त्या अंतर्गत कीर्तन, भजन, पारायणे आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या आध्यात्मिक महोत्सवामुळे संपूर्ण वातावरणात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले आहे. मात्र, दुसरीकडे करमाळा शहर व ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या लाऊडस्पीकर आणि कर्नाळ्यांच्या (ध्वनिघोषक) मोठ्या आवाजामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.
धर्म संस्कृतीचे जतन व्हावे, तिची ओळख पुढील पिढीला लाभावी आणि विचारांचे आदानप्रदान व्हावे, यासाठी असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करणे नितांत आवश्यक आहे. या माध्यमातून गावोगावी प्रबोधनही होते. परंतु, हे कार्यक्रम मोठ्या आवाजात व रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर लावून करण्याची खरंच गरज आहे का? असा प्रश्न आता करमाळ्यातील सुजाण नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
या संदर्भात नागरिकांमधून जुन्या काळाची आठवण काढली जात आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत नामदेव महाराज आदींनी कोणतीही आधुनिक वाद्ये किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांशिवाय केवळ आपल्या ओघवत्या वाणीतून आणि विचारांच्या प्रभावाने कीर्तने व प्रबोधन केले. त्यांचे विचार आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. याउलट, अलीकडच्या काळात करमाळा तालुक्यात कोणतीही जयंती, पुण्यतिथी, उत्सव किंवा इतर कार्यक्रमांमध्ये पहाटेपासून सुरू होणारा भोंग्यांचा आणि लाऊडस्पीकरचा आवाज थेट रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत सुरू राहत असल्याचे चित्र आहे.
या कर्णकर्कश आवाजामुळे वृद्ध, लहान मुले, अभ्यास करणारे विद्यार्थी आणि रुग्णांच्या झोपेत मोठा अडथळा निर्माण होत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि रात्रीच्या शांततेच्या नियमांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी करमाळा शहर व परिसरातील अशा उशिरापर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमांवर पोलीस प्रशासनाने कठोर नियंत्रण आणावे, अशी तीव्र मागणी त्रस्त नागरिकांकडून होत आहे.
भक्तीचा आनंद घेत असताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे हीच खरी धर्माची आणि सामाजिक जबाबदारीची शिकवण ठरेल, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!