११ दिवसांत चार दुःखद आघात; अमळनेरच्या फोटोग्राफर बांधवांनी साधेपणाने साजरा केला जागतिक छायाचित्रण दिन

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-19 at 4.18.46 PM

११ दिवसांत चार दुःखद आघात; अमळनेरच्या फोटोग्राफर बांधवांनी साधेपणाने साजरा केला जागतिक छायाचित्रण दिन

अमळनेर : तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांवर अवघ्या ११ दिवसांत चार मोठे दुःखद आघात झाल्याने यंदाचा १९ ऑगस्टचा जागतिक छायाचित्रण दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. कोणताही मोठा कार्यक्रम न करता ज्येष्ठ फोटोग्राफरांच्या हस्ते कॅमेरा पूजन करून दिवसाचे औचित्य साधण्यात आले.३१ जुलै रोजी अमळनेर शहराला आलेल्या महापुराचा मोठा फटका फोटोग्राफर बांधवांनाही बसला. पिंपळे नाला आणि बोरी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पूरपरिस्थितीत फोटोग्राफर प्रेम पाटील व प्रणव महाजन यांच्या स्टुडिओचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या धक्क्यातून ते सावरत असतानाच ३ ऑगस्ट रोजी मांडळ येथील फोटोग्राफर उदय बच्छाव यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.उदय बच्छाव यांच्या पत्नी गायत्री यांना प्रसूतीसाठी धुळे येथे दाखल करण्यात आले होते. त्यांनी जुळ्या कन्यांना जन्म दिला; मात्र नियतीने त्यांच्यावर घाला घातला आणि प्रसूतीनंतर केवळ दोन दिवसांत गायत्री यांचे निधन झाले. आईचे छत्र हरपल्याने दोन चिमुकल्या जुळ्या मुलींच्या रूपाने बच्छाव कुटुंबावर मोठे संकट कोसळले. या हृदयद्रावक घटनेने फोटोग्राफर बांधवांमध्ये शोककळा पसरली.या दुःखातून सावरत असतानाच १० ऑगस्ट रोजी फोटोग्राफर आनंद पाटील यांच्या वहिनी व हेमंत पाटील यांची पत्नी उर्मिला पाटील यांचेही दुःखद निधन झाले. त्यामुळे फोटोग्राफर बांधवांमध्ये पुन्हा शोककळा पसरली.या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनने यंदाचा जागतिक छायाचित्रण दिन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रमावर होणारा खर्च टाळून तो निधी उदय बच्छाव यांच्या जुळ्या चिमुकल्या मुलींच्या भविष्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. फोटोग्राफर बांधवांकडून शक्य ती आर्थिक मदत जमा करून ती रक्कम मुलींच्या नावाने एफडीच्या स्वरूपात ठेवण्यात येणार आहे.विशेष म्हणजे, पुरामुळे स्वतःचे मोठे नुकसान झालेले प्रेम पाटील आणि प्रणव महाजन यांनीही “आमच्यापेक्षा या चिमुकल्यांना मदतीची अधिक गरज आहे,” अशी भावना व्यक्त करून मदतीसाठी पुढाकार घेतला. स्वतः संकटात असतानाही सहकाऱ्याच्या कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे करण्याची ही भावना फोटोग्राफर बांधवांमधील एकजूट आणि माणुसकीचे दर्शन घडवणारी ठरली.“संकटाच्या काळात आपणच आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहायचे,” या भावनेतून अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनने यंदाचा जागतिक छायाचित्रण दिन साधेपणाने साजरा करत माणुसकीचा आदर्श निर्माण केला. यावेळी तालुक्यातील मोठ्या संख्येने फोटोग्राफर बांधव उपस्थित होते.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!