अपनी भाषा में पढ़े! Translate

 

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहराला पुरवठा करणारी बोरी नदीवरील मुख्य जलवाहिनी पुराच्या प्रचंड प्रवाहात तुटल्याने अमळनेर शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. सुरुवातीला दोन ते तीन दिवसांत परिस्थिती पूर्ववत होईल, असा दावा नगरपरिषदेकडून करण्यात आला होता. मात्र आता नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेतच पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी लागणार असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. तोपर्यंत शहरातील सर्व भागांना रोटेशन पद्धतीने केवळ एक तास पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या भागांमध्ये पाणी पोहोचत नाही किंवा अत्यल्प दाबाने येत आहे, त्या भागांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाने केली. त्यावर नगरपरिषदेने गरजेनुसार टँकरची व्यवस्था करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. दरम्यान, नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले.

पत्रकार परिषदेत पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांनी संबंधित पाइपलाईन “तात्पुरत्या स्वरूपाची” असल्याचे सांगितले. याच विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारण, तात्पुरत्या पाइपलाईनसाठी तब्बल एक कोटी रुपयांचा खर्च करण्याचे नियोजन होत असल्याने नागरिकांकडून तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर ही व्यवस्था तात्पुरतीच असेल, तर एवढ्या मोठ्या निधीचा वापर कितपत योग्य, असा सवाल शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी मुंबईहून 50 नवीन पाइप मागवण्यात आल्याची माहिती देत, पाइपलाईन जोडण्याचे काम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवघड असल्याने दोन पथके रात्रंदिवस कार्यरत असल्याचे सांगितले. डीपीडीसीमधून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून शक्य तितक्या लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र प्रस्तावित पाइप लाईनसाठी वापरण्यात येणाऱ्या पाईप चा गेज बारीक असून ती पुलावरून टाकण्याचा विचार होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

भविष्यात एखाद्या अवजड वाहनाच्या धडकेत पाइपलाईन फुटली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? वाहतुकीसाठी बांधलेल्या पुलावर पाणीपुरवठ्याची पाइपलाईन कितपत सुरक्षित राहील? सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) अशा तांत्रिक अडचणींवर कोणत्या निकषांवर परवानगी देणार? आणि पुन्हा पाइपलाईन फुटल्यास नव्याने ठेके व खर्चाचे चक्र सुरू होणार का? अशा प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळणे आता गरजेचे असल्याची भावना अमळनेरकर व्यक्त करत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!