बारामती तालुका पोलिसांचे गुन्हे प्रतिबंधासाठी मोटारसायकल पेट्रोलिंग; टवाळखोरांना कडक इशारा
बारामती,प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने बारामती तालुका पोलीस स्टेशनकडून हद्दीतील विविध भागांत नियमित मोटारसायकल पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे.
या पेट्रोलिंगदरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचारी शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे तसेच संवेदनशील परिसरात सकाळी आणि सायंकाळी गस्त घालत आहेत. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
बारामती तालुका पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही किरकोळ कारणावरून वादविवाद किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच सार्वजनिक रस्त्यांवर उनाडगिरी, टवाळखोरी, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे किंवा नागरिकांना त्रास देणाऱ्या व्यक्तींवरही कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
कायद्याचे पालन करून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही बारामती तालुका पोलिसांकडून करण्यात आले आहे.