आरटीईच्या हक्कांवर गदा; सायरादेवी बोहरा स्कूल वादाच्या भोवऱ्यात चौकशीची होतेय मागणी
अमळनेर : विक्की जाधव.
शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत गरीब व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची कायदेशीर तरतूद असताना अमळनेर येथील सायरादेवी बोहरा स्कूलच्या आरटीई नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शालेय साहित्य, पुस्तके, गणवेश आदींच्या नावाखाली प्रत्येकी सुमारे सात हजार रुपये वसूल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शासनाकडून प्रतिपूर्ती मिळत असतानाही पालकांकडून रक्कम घेतली जात असल्याचा आरोप समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पालकांच्या म्हणण्यानुसार, केवळ आर्थिक मागणीच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पालकांना वर्गशिक्षकांना भेटण्यासही मज्जाव केला जात आहे. “जे करायचे ते करा”, “आमच्याकडे अशी परवानगी नाही” अशा अरेरावीच्या भाषेत पालकांना उत्तर दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शाळा प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची दखल घेत पालकांनी थेट राज्याच्या शिक्षण मंत्र्यांपासून ते शिक्षण संचालकांपर्यंत विविध स्तरांवर लेखी तक्रारी दाखल केल्याचे सांगितले जात आहे. आरटीई कायद्याचा उद्देश गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा असताना जर त्यांच्याच पालकांकडून हजारो रुपये उकळले जात असतील, तर हा केवळ नियमभंग नसून शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर घाला असल्याची भावना व्यक्त होत आहे. आता शिक्षण विभाग या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का, याकडे अमळनेरसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
तर कोणही अवाजवी पैसे पालकांकडून उकळत असेल तर त्यांनी मार्मिक सोबतही संपर्क साधावा.