अनधिकृत नळजोडण्यांचा होतोय खुलासा; पालिकेतील कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता हा गोरखधंदा?
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य पाइपलाईन फोडून बेकायदेशीर नळ कनेक्शन काढल्याच्या प्रकरणाने आता मोठे स्वरूप धारण केले असून शहरात पाणीचोरीचे संघटित रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या प्रकरणात पालिकेचा कर्मचारी कमरोद्दीन शेख हुसेन याचे नाव समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शासनाची दिशाभूल करून सार्वजनिक पाण्यावर डल्ला मारण्याचा हा प्रकार नेमका किती वर्षांपासून सुरू आहे? याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, नुकत्याच टाकण्यात आलेल्या नवीन पाइपलाईनमधूनही अनेक ठिकाणी अनधिकृत कनेक्शन देण्यात आल्याचे समोर येत आहे. शहरातील वाढत्या कॉलन्यांमध्ये पालिकेतील काही कर्मचारी वैयक्तिक फायद्यासाठी पैशांची देवाणघेवाण करून परस्पर पाइपलाईन जोडत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे, शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनची संख्या तब्बल दहा हजारांपेक्षा अधिक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून त्यामुळे पालिकेच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याचे बोलले जात आहे.
मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे या प्रकरणात गुन्हे दाखल झाले असले तरी आता केवळ काही जणांवर कारवाई करून विषय दाबण्याऐवजी संपूर्ण पाणीचोरी रॅकेट उघड करण्याची मागणी होत आहे. कमरोद्दीन शेख याच्यासह शासनाची दिशाभूल करून बेकायदेशीर कनेक्शन देणारे, त्याला संरक्षण देणारे आणि आर्थिक लाभ घेणाऱ्या सर्व संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी संतप्त भावना शहरभरातून व्यक्त होत आहे.