अफवेमुळे अमळनेरमध्ये पेट्रोल पंपांवर गर्दी; प्रशासनाने टंचाई नसल्याचे केले स्पष्ट
अमळनेर : विक्की जाधव.
जळगाव जिल्ह्यात पेट्रोल टंचाईच्या अफवांमुळे अमळनेर शहरात काल रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सोशल मीडियावर पेट्रोल संपत असल्याच्या अफवा पसरल्यानंतर अनेक नागरिकांनी घाईघाईने पेट्रोल भरण्यासाठी पंपांकडे धाव घेतली.

काही नागरिकांनी तर जे भांडे मिळेल त्यामध्ये पेट्रोल साठवण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले. काहीजण बाटल्यांमध्ये तर एका नागरिकाने चक्क दुधाच्या कॅनमध्ये पेट्रोल भरून घेतल्याची चर्चा शहरात सुरू होती.

अफवांमुळे शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याचे चित्र दिसून आले, तर प्रमुख पेट्रोल पंप, नायरा पेट्रोल पंप व बोहरी पेट्रोल पंप येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र ही परिस्थिती केवळ अफवांमुळे निर्माण झाल्याचे नंतर स्पष्ट झाले.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पेट्रोलचा साठा करण्याचा प्रयत्न करू नये आणि पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन केले आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला असून नागरिकांनी शांतता व संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.