अंबर्शी टेकडी पुन्हा धगधगली; शंभरहुन अधिक झाडांचे नुकसान
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील निसर्गरम्य अंबर्शी टेकडीवर पुन्हा एकदा आग लागून सुमारे १०० झाडे जळून खाक झाली. समाजकंटकांमुळे लागलेल्या या आगीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास टेकडीच्या खालच्या बाजूस धुराचे लोट दिसू लागले आणि काही क्षणांतच आगीने वेग घेतला. टेकडीप्रेमी नागरिकांनी तत्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी
रमेश कंजर, नरेश कांबळे आणि सुरेश भावसार यांनी सुरुवातीला स्वतःच्या परीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार पालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

दलप्रमुख गणेश गोसावी, दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, जफर पठाण, भिका संदानशिव आणि आकाश संदानशिव यांनी तातडीने आग नियंत्रणात आणली. वेळेत उपाययोजना झाल्याने मोठा अनर्थ टळला.
अंबर्शी टेकडी हे शहराचे ‘हरित फुप्फुस’ मानले जाते. येथे पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र असून दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. मात्र बिडी, सिगारेट किंवा इतर व्यसनासाठी येणाऱ्या काही समाजकंटकांकडून पेटती काडी टाकल्याने वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. पर्यावरणाचे होत असलेले नुकसान थांबवण्यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची तीव्र मागणी आहे.