भारत अवकाश संशोधनात जगात चौथे अमळनेरमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
अमळनेर : विक्की जाधव.
खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या करिअर कौन्सिलिंग सेंटरतर्फे आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत अवकाश संशोधनाचा रोमहर्षक प्रवास उलगडला. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात पूज्य साने गुरुजी मोफत वाचनालयाचे संचालक विजय सिंह पवार यांनी “अवकाश संशोधन” या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना भारताने अवकाश क्षेत्रात केलेली अभूतपूर्व झेप अधोरेखित केली. स्क्रीनिंग टाइमपेक्षा रिडींग टाइम वाढवण्याची गरज सांगत त्यांनी रशिया, अमेरिका व भारताच्या अवकाश मोहिमांचा तुलनात्मक आढावा घेतला. स्पुतनिक-१ पासून चंद्रयान-३ व आदित्ययानपर्यंतचा प्रवास उलगडत भारत दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले राष्ट्र ठरल्याचे सांगून, विक्रम साराभाई, होमी भाभा व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या योगदानाचा गौरव केला. भारत आज अवकाश संशोधनात जगात चौथ्या क्रमांकावर असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
दुसऱ्या सत्रात डॉ. विवेक बडगुजर यांनी यूपीएससी, एमपीएससी व सरळसेवा परीक्षांची तयारी कशी करावी यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभ्यासक्रमाचे नियोजन, योग्य नोट्स काढण्याची पद्धत, प्रश्नांचे स्वरूप व काठिण्य पातळी यांचे नेमके विवेचन करत वेळेचे व्यवस्थापन हे यशाचे प्रमुख सूत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यशाळेला प्राध्यापक, ग्रंथपाल व सीसीएमसी विभागातील सदस्यांचे सहकार्य लाभले असून मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विजय साळुंखे यांनी केले तर आभार ग्रंथपाल दिपक पाटील यांनी मानले.