देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती; सात देशांच्या मुख्य न्यायमूर्तींच्या उपस्थितीत शपथविधी
नवी दिल्ली /वर्षा चव्हाण
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज (२४ नोव्हेंबर) भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष समारंभात त्यांना शपथ दिली. मावळते सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या काल (२३ नोव्हेंबर) झालेल्या सेवानिवृत्तीनंतर सूर्यकांत यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील १५ महिने, म्हणजे ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत ते सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळतील.
हा शपथविधी समारंभ ऐतिहासिक ठरला, कारण प्रथमच सात देशांच्या मुख्य न्यायमूर्तींनी भारतातील सरन्यायाधीशांच्या शपथविधीस हजेरी लावली. यात भूतानचे मुख्य न्यायमूर्ती ल्योनपो नोरबू शेरिंग, केनियाच्या मुख्य न्यायमूर्ती मार्था कूमे, मलेशियाच्या संघीय न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती नलिनी पथमनाथन, मॉरीशसच्या मुख्य न्यायमूर्ती बीबी रेहाना मुंगली-गुलबुल, तसेच नेपाळचे मुख्य न्यायमूर्ती प्रकाश मानसिंह राऊत यांचा समावेश होता.
🟠कोण आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत?
न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा जन्म १० फेब्रुवारी १९६२ रोजी हरियाणातील हिसार येथे झाला. मध्यमवर्गीय कुटुंबातील सूर्यकांत यांनी १९८१ साली हिसार येथील शासकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी घेतली. १९८४ मध्ये रोहतकच्या महर्षी दयानंद विद्यापीठातून त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि हिसार न्यायालयात वकिली सुरू केली.
१९८५ मध्ये ते चंदीगडला स्थलांतरित झाले व पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात त्यांनी संवैधानिक, सेवा आणि दिवाणी कायद्यात भक्कम स्थान मिळवले.
९ जानेवारी २००४ रोजी त्यांची पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर ऑक्टोबर २०१८ ते मे २०१९ या कालावधीत त्यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले.
२४ मे २०१९ रोजी ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. कलम ३७० रद्द करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नागरिकत्व हक्क अशा अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीत त्यांचा सहभाग राहिला आहे.
१२ नोव्हेंबर २०२४ पासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नियुक्तीसह भारताच्या न्यायपालिकेत एक नवीन पर्व सुरू झाले असून त्यांच्या पुढील १५ महिन्यांच्या कार्यकाळाकडे देशाचे लक्ष लागले आहे.